संगीत नाटक अकादमी पुरस्काराविषयी कशाळकर, केदार यांची भावना

पुणे : अभिजात शास्त्रीय संगीतामध्ये गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संगीत क्षेत्रातील प्रत्येकासाठी महत्त्वाचा दिवस असलेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जाहीर झालेला संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार हा तर गुरुप्रसादच आहे. आमच्यावर मेहनत घेणाऱ्या गुरूंना या पुरस्काराचे श्रेय जाते, अशी भावना गायक समीहन कशाळकर आणि गायिका रुचिरा केदार यांनी बुधवारी व्यक्त केली.

ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांचे पुत्र व शिष्य समीहन कशाळकर आणि शिष्या रुचिरा केदार यांना संगीत नाटक अकादमीतर्फे यंदाचा उस्ताद बिस्मिल्ला खाँ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने या दोन्ही कलाकारांनी आपली भावना व्यक्त केली. एकाच गुरूच्या दोन शिष्यांना हा पुरस्कार जाहीर होण्याचा योग यानिमित्ताने जुळून आला आहे.

रचिरा केदार म्हणाल्या, कोणत्याही कलाकाराची संगीताची वाटचाल अविरत सुरू असते. त्याला संगीत नाटक अकादमी यासारख्या मोठय़ा संस्थेची मान्यता मिळाल्यामुळे मनस्वी आनंद झाला आहे. मात्र, या पुरस्कारामुळे गुरूंनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी वाढली आहे. मी मूळची भोपाळची. वडील दिलीप काळे यांच्याकडे माझे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांनी मला पुण्याला ज्येष्ठ गायिका डॉ. अलका देव-मारुलकर यांच्याकडे आणून सोडले. त्यांनी संगीत विद्या तर दिलीच. पण, आईच्या मायेने माझी काळजी घेतली. नंतरच्या टप्प्यावर कोलकाता येथील आयटीसी संगीत अकादमीमध्ये पं. उल्हास कशाळकर आणि विदुषी गिरिजा देवी हे गुरू म्हणून लाभले.

समीहन कशाळकर म्हणाले, संगीत ही गुरुमुखी विद्या असून गुरूसमोर बसूनच विद्यार्थ्यांला ती आत्मसात करता येते. अनेकांना गुरुचा शोध घ्यावा लागतो. पण, पं. उल्हास कशाळकर यांच्या रूपाने मला घरातच गुरु लाभले. गुरू म्हणून ते कडक शिस्तीचे आहेत. एरवी घरामध्ये ते प्रेमळ वडील असतात. कोलकाता येथील आयटीसी संगीत अकादमीमध्ये पं. उल्हास कशाळकर आणि गिरिजा देवी यांची तालीम मिळाली. अनेक दिग्गज कलाकारांना ऐकूनच मी शिकलो आहे.