पुणे : एकल पालकत्वामुळे सगळ्या गोष्टी त्या पालकाच्या अंगावर येऊन पडतात. आपले मूल सर्वसामान्य मुलांसारखे असावे, असे प्रत्येक पालकाला वाटत असते. कदाचित आपले मूल वेगळे असेल तर आपले म्हणणे त्याच्यावर लादू नका. सेवा देणारे, काळजीवाहक आणि संरक्षक याबरोबरच एकल पालकाने मुलांशी मैत्री करणे गरजेचे आहे,’ असा सल्ला निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी शनिवारी दिला.

क्रिसेंट म्युचुअल फंड डिस्ट्रिब्युटर्सच्या वतीने एकल पालक दिनानिमित्त आयोजित एकल पालक संमेलनात मृदुला भाटकर बोलत होत्या. दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांनी संवाद साधला. ‘क्रिसेंट’चे भूषण वाणी यांनी एकल पालकांना गुंतवणुकीसंदर्भात मार्गदर्शन केले. समुपदेशक स्मिता जोशी यांनी मुलांसमवेत सादर केलेल्या नाटिकेतून या मुलांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला.

कार्यक्रमात वीरमाता गीता गोडबोले, वीरपत्नी दीपाली मोरे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत अंजली देशपांडे या एकल पालकांचा सत्कार करण्यात आला.भाटकर म्हणाल्या, ‘अपघात किंवा आजारपणामध्ये जोडीदाराला गमवावे लागले असेल तसेच घटस्फोट झाल्याचे निमित्ताने वेगळे राहण्यातून मुलांचे संगोपन करताना एकल पालकांना सर्व आव्हाने पेलावी लागतात.

परदेशात विवाहापूर्वी मातृत्व मान्य केले जाते. भारतात अशी परिस्थिती नाही. एकल पालकत्वामुळे सगळ्या गोष्टी अंगावर येऊन पडतात. आपले म्हणणे मुलांवर लादण्याचा आटापिटा करू नका. तुम्ही मुलांसाठी सेवा देणारे, काळजीवाहक, संरक्षक असतो. त्याबरोबरच मुलांशी मैत्र जपणे महत्त्वाचे आहे. वाईट पत्नी, पती हे कधीच वाईट आई-बाबा नसतात.

एकल माता असेल तर तिने समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करून मुलाच्या संगोपनासाठी खंबीर झाले पाहिजे.’‘देशात साडेसात ते आठ टक्के एकल पालक आहेत. या लोकसंख्येविषयी खूप कमी बोलले जाते. ही उणीव भरून काढण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,’ अशी भूमिका प्रास्ताविकामध्ये स्पष्ट करण्यात आली.

कोट

कायदा आपोआप होत नाही. समाजाची गरज निर्माण होईल तसा कायदा होतो. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बिंदुमाधव जोशी यांनी उभारलेल्या ग्राहक चळवळीतून ग्राहक संरक्षण कायदा झाला. आपल्याकडे पूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदा नव्हता. विवाहानंतर आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या किंवा वृद्धाश्रमात रवानगी करणाऱ्या मुलांपासून संरक्षण ही सामाजिक गरज झाल्यानंतर हा कायदा अस्तित्वात आला. त्याच धर्तीवर एकल पालकांकडून मागणीचा रेटा झाला तर, त्यांच्यासाठी आणि एकल पालकांच्या मुलांसाठी कायदे होतील.

  • मृदुला भाटकर, निवृत्त न्यायमूर्ती