पुणे : शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दारूच्या व्यसनाने मृत्यू, कॅन्सरने मृत्यू, रस्ते अपघातमुळे एकट्या महिलांचे प्रमाण वाढत असून, राज्यात ८० लाखांहून अधिक एकल महिला असल्याचे निरिक्षण ‘साऊ एकल महिला समिती’चे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी नोंदवले. राज्याच्या लोकसंख्येच्या २० टक्के एकल महिला आहेत. मात्र, या प्रश्नावर अजूनही धोरणात्मक काम होत नाही. समाज म्हणून आपणही त्यांच्याबद्दल संवेदनशील नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ नागरिक एकल महिलांचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र, त्यांच्यासाठी शासनाची कोणतीही योजना नाही. पुण्यासारख्या शहरात बालसंगोपन केंद्राची दुरावस्था झाली असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महानगरांमधील एकल महिलांवर अन्याय होत असल्याकडेही कुलकर्णी यांनी लक्ष वेधले.

नारी समता मंच, मिळून साऱ्याजणी, सखी साऱ्याजणी, अक्षर स्पर्श ग्रंथालय, साथ साथ विवाह अभ्यास मंडळ आणि पुरुष उवाच यांच्या वतीने आयोजित चर्चासत्रात कुलकर्णी बोलत होते. त्यांनी ‘एकल महिलांचे संघटन, त्यांचे प्रश्न’ या विषयावर भाष्य केले. या वेळी गीताली वि. म., विनता बाळ, शुभांगी देशपांडे, रेखा डांगे उपस्थित होत्या.

‘देशात २०११ च्या जनगणेनुसार एकल महिलांचे प्रमाण एकूण जनगणनेच्या १२ टक्के आहे. त्यात उत्तर प्रदेशात सर्वाधिक एकल महिला, तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. मात्र, अद्यापही त्यांच्या प्रश्नावर धोरणात्मक काम होत नाही. एकल महिलांसमोर रोजगाराचा प्रश्न दिसतो. त्यांच्यात जोखीम घ्यायची तयारी नसते. त्यामुळे आपला व्यवसाय चालेल का, भांडवल कसे उभारायचे, मार्केटिंग कशी करायची, असे प्रश्न एकल महिलांसमोर असतात. मात्र, रोजगार हेच त्यांच्या पुर्नवसनाचे माध्यम आहे. त्यासाठी सर्व पातळ्यांवर काम करणे गरजेचे आहे,’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.

‘एकल महिलांना उद्योगासाठी भांडवलाची आणि त्यांच्या उत्पदनासाठी बाजाराची गरज आहे. शासनाने ‘उमेद’मधून बचत गट जोडले. बचत गटातून व्यक्तिगत कर्जांच्या योजना सुरू झाल्या. तिथे सुमारे ३ टक्के व्याजदराने पैसे मिळतात. खाद्यपदार्थाशी संबंधित व्यवसाय असेल तर, सुमारे ४० हजार रूपये शून्य टक्के व्याजदराने मिळू शकतात. बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये क्रांतीच होत आहे. त्याला अधिक चांगली दिशा आणि बाजाराची जोड मिळाली, तर महिलांच्या अनेक अडचणी सुटतील,’ असा विश्वासही कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले,‘अर्ध्यापेक्षा जास्त एकल महिला बालविवाहीत असतात. वयाच्या चाळीशीनंतर त्यांचा एकटेपणा सुरू होतो. या महिलांचा भावनिक पातळीवर विचार करणे गरजेचे आहे. एकल महिलेला विभक्त कुटुंबात स्थान नसते. त्यामुळे गावामध्ये कुठेतरी खोली घेऊन राहण्याची वेळ तिच्यावर येते. शारिरिक, मानसिक पातळीवर खचल्याने या महिलांच्या फसवणुकीची शक्यता अधिक असते.’

‘एकल महिलेबरोबर लग्न करणाऱ्या मुलाच्या नावावर जिल्हा परिषदेने एक लाख रुपयांची ठेव पावती टाकायची, अशी एखादी योजना जाहीर करण्याची गरज आहे. नाशिक जिल्हा परिषदेने या धरतीवर एकल महिलांचा विवाह मेळावा आयोजित केला. त्यात काही महिलांची लग्नेही झाली,’ या उदाहरणाद्वारे प्रशासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वयातून प्रश्न सुटतात असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

जिल्हा (केवळ ग्रामीण भाग)… एकल महिलांची संख्या

  • १) सातारा… १ लाख २२ हजार
  • २) जळगाव… १ लाख २२ हजार
  • ३) अहिल्यानगर… १ लाख २० हजार
  • ४) पुणे… १ लाख १० हजार
  • ५) नाशिक… १ लाख ७ हजार
  • ६) नांदेड… ९६ हजार
  • ७) बीड… ८४ हजार
  • ८) बुलढाणा… ८४ हजार
  • ९) छत्रपती संभाजीनगर… ६७ हजार
  • १०) धाराशिव… ६७ हजार
  • ११) जालना… ५९ हजार
  • १२) लातूर… ५९ हजार
  • १३) नंदुरबार… ५८ हजार
  • १४) हिंगोली… २७ हजार
  • १५) रत्नागिरी… ५५ हजार
  • १६) सिंधुदुर्ग… ३७ हजार
  • १७) गडचिरोली… २५ हजार

‘या जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण सुरू’

‘चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, यवतमाळ, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये एकट्या महिलांचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच आगामी काळात उर्वरीत सर्व जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण व्हावे म्हणून प्रयत्न करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती हेरंब कुलकर्णी यांनी दिली. हे सर्वेक्षण संबंधित जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातच होत असून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत आणि बचत गटांद्वारे माहिती गोळा करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार राज्यात सुमारे ८० लाख ते एक कोटी एकल महिला असल्याचेही कुलकर्णी यांनी नमूद केले.