पुणे : ‘ गड आला पण सिंह गेला ‘ अशी ओळख असलेल्या पुण्याजवळील किल्ले सिंहगड येथे भव्य असा भगवा ध्वज लवकरच फडकताना दिसणार आहे. स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले सिंहगडावर पुणे महापालिकेच्या वतीने १०० फुटी भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे.
महापौर मंजूषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे पुणे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य, पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगडावर पर्यटकांची दररोज गर्दी होते. सिंहगडावरील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) जवळील एक एकर जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. तेथे हा ध्वज उभारला जाणार आहे. किल्ल्याच्या विविध भागांतून तसेच सिंहगड परिसरापासून दूरवरून देखील हा भगवा ध्वज स्पष्टपणे दिसला पाहिजे, अशी जागा निवडली जाणार आहे.
महापौर नागपुरे यांनी या पाहणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांकडून जागा, ध्वजस्तंभाची उंची, सुरक्षितता, संरचनात्मक बाबी तसेच परिसराच्या दृष्टीने आवश्यक नियोजनाची माहिती घेतली. ध्वज उभारणीनंतर रात्रीच्या वेळीही त्याचे स्वरूप उठून दिसावे, यासाठी अत्याधुनिक विद्युत रोषणाईची विशेष व्यवस्था करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात येईल, अशी ग्वाही महापौर नागपुरे यांनी दिली.
सिंहगडावर पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी तर सिंहगडावर नागरिकांची मोठी गर्दी होते. यामध्ये लहान मुलांपासून जेष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. या दिवशी ट्रेकिंगसाठी येथे येणाऱ्या अनेक गडप्रेमींना सिंहगडाची भुरळ पडल्याने गडावर येणाऱ्यांची संख्या अधिकच वाढत चालली आहे .
सिंहगडावर येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यापूर्वी महापालिकेकडून करण्यात आला आहे. पुणे शहराचा नावलौकिकात भर घालण्याचे काम सिंहगड करत असतो केवळ देशातीलच नव्हे तर परदेशातील विविध भागातील नागरिक आवर्जून सिंहगडाला भेट देण्यासाठी येत असतात. त्यामुळे महापालिका आवश्यकते मदत सिंहगडासाठी करत असते.
महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक मुख्य व्यवस्थापक हनुमंत खेडे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या, सिंहगडावर उभारण्यात येणारा भगवा ध्वज महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे, स्वराज्याच्या विचारांचे आणि शौर्यपरंपरेचे प्रतीक ठरेल अशा पद्धतीने उभारला जाणार आहे. या ध्वजामुळे पुणे शहराच्या नावलौकिक अधिक वाढेल.
