पुणे : सिंहगडावर फिरायला आलेल्या पर्यटकाच्या आठ वर्षांच्या मुलीने ‘बरमुडा’ परिधान केल्याने पर्यटकाला मारहाण केल्याची गटना घडली. या घटनेनंतर एका संघटनेच्या आठ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबत एकाने हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हिंदू बांधव आर्मी या संघटनेच्या आठ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार, त्यांची पत्नी, मुलगा, पुतण्या आणि मित्र हे रविवारी (१६ ऑगस्ट) फिरायला आले होते. तक्रारदार आणि कुटुंबीयांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसरात छायाचित्र काढले. त्या वेळी संघटनेचे आठ ते नऊ कार्यकर्ते तेथे आले. ‘येथे छायाचित्र का काढता?’, अशी विचारणा केली. त्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की करण्यात आली. तेथे असलेल्या तरुण-तरुणींना धक्काबुक्की करण्यात आली.
‘सिंहगडावर आलेल्या कुटुंबातील आठ वर्षांच्या मुलीने ‘बरमुडा’ परिधान केला होता. या कारणावरून मुलीच्या वडिलांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच, तेथे असलेल्या तरुण-तरुणींना धक्काबुक्की करण्यात आली. असे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल’, असे हवेली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी सांगितले.
