पुण्यातील पर्यटन स्थळ म्हणून पर्यटकांनी सर्वाधिक पसंती दिलेला सिंहगड आता प्लास्टिक कचरा मुक्त करण्याचा संकल्प पर्यटन विभाग आणि वनखात्यानेच केला आहे. त्यामुळे आता सिंहगडावर जाताना प्लास्टिकची बाटली नेण्यासाठी एप्रिल महिन्यापासून अनामत रक्कम द्यावी लागणार आहे.
स्वच्छ भारत अभियानामध्ये राज्यातील पर्यटनस्थळेही स्वच्छ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. पुणे विभागाने आदर्श पर्यटनस्थळ निर्माण करण्यासाठी सिंहगडाची निवड केली आहे. सिंहगड प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्त करण्याचा संकल्प पर्यटन विकास महामंडळ आणि वनविभागाने केला आहे. त्यासाठी विविध उपाय विभागाने आखले आहेत. सिंहगडावर कोणत्या प्रकारचा कचरा सर्वाधिक साठतो आणि तो कोणत्या माध्यमातून साठतो याची पाहणीही स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने विभागाने नुकतीच केली. त्यानुसार पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थाची पाकिटे, चहाचे प्लास्टिकचे कप, शेंगाची टरफले, बिया सर्वाधिक आढळून आल्या. त्यातील प्लास्टिक कचऱ्याला आळा घालण्यासाठी विभागाने योजना आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गडावर प्लास्टिकच्या पाकिटांमधील खाद्यपदार्थ, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या नेण्यास बंदी करण्यात येणार आहे.
पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पर्यटकांच्या सामानाची पाहणी करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या बाटल्या न्यायच्या असतील, तर त्यासाठी काही अनामत रक्कम जमा करून नेलेल्या बाटल्या सुरक्षारक्षकांकडे पुन्हा जमा केल्यावर अनामत रक्कम परत मिळणार आहे. प्रत्येक बाटली मागे साधारण २० ते २५ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गडवर खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांनाही प्लास्टिकच्या कपांऐवजी माती, चिनीमाती, काच यांचे कप वापरण्याच्या सूचना विभागाने केल्या आहेत. शेंगा विक्रेते, फळ विक्रेते यांनाही प्लास्टिकच्या पिशव्या देण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गडावर धूम्रपानसाठी घालण्यात आलेल्या बंदीची अंमलबजावणीही सुरू झाली आहे, अशी माहिती वनविभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
याबाबत वनविभागाचे अधिकारी सत्यजित गुजर यांनी सांगितले, ‘कागद, प्लास्टिकच्या डिश यांच्याऐवजी पानांचे द्रोण वापरण्यात यावेत. तसेच प्लास्टिकच्या कपांऐवजी काचेचे ग्लास, मातीचे कुल्हड वापरण्यात यावेत अशा सूचना विक्रेत्यांना करण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत विक्रेत्यांची बैठकही घेण्यात आली आहे. पर्यटक पाण्याच्या बाटल्या नेतात आणि तिथेच टाकून देतात. त्यामुळे बाटलीची विक्री करतानाच त्यासाठी अनामत रक्कमही घेण्याची योजना आहे. गडावर वेळोवेळी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जागोजागी कचरा पेटय़ाही ठेवण्यात येणार आहेत. पर्यटकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. टप्प्याटप्प्याने या सगळ्याची अंमलबजावणी होणार असून १ एप्रिलपासून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येईल.’
सुरक्षारक्षकांना बचावकार्याचे प्रशिक्षण
सिंहगडावर गेल्या आठवडय़ात दोन युवक अडकले होते. स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन या युवकांची सुटका करण्यात आली. त्या पाश्र्वभूमीवर आता वनविभागाचे सुरक्षारक्षक आणि स्थानिक नागरिकांनाच बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्था अशा घटनांमध्ये मदत करतात. मात्र, सुरक्षारक्षक किंवा स्थानिक नागरिकांना याबाबत प्रशिक्षण दिले असेल, तर मदत लवकर मिळू शकेल, त्यामुळे हा उपक्रम राबवण्यात येत आहे, असे गुजर यांनी सांगितले.