पुणे : Vanraj Andekar Murder in Pune राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री नाना पेठेत घडली. रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आंदेकर यांच्या मेहुण्याने त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केल्याचे उघड झाले असून, या घटनेनंतर नाना पेठेत घबराट उडाली आहे.
हेही वाचा >>> खराडीतील नदीपात्रात सापडलेल्या महिलेची मृतदेहाची ओळख पटली, संपत्तीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने केला खून
वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्या वेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. तसेच, कोयत्याने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नाना पेठ परिसरात आंदेकर टोळीचा दबदबा आहे. त्यामुळे वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात घबराट उडाली. वनराज यांच्यावर त्यांच्या बहिणीचा पती गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार कदम यांनी गोळीबार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कौटुंबिक वादातून कोमकरने गोळीबार केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. कोमकरने काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे शहर प्रमुख रामभाऊ पारिख यांच्यावर ॲसीड हल्ला केला होता. २८ ऑगस्ट रोजी कोमकरने वनराज आंदेकर आणि त्यांच्या भावाविरुद्ध मालमत्तेच्या वादातून समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात धुसफूस सुरू होती.