आलिशान मोटारींना आग लागण्याच्या प्रकारांत वाढ

पिंपरी : रस्त्यावरून भरधाव धावणाऱ्या आलिशान मोटारींना आग लागण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. गेल्या महिनाभरात अशा सहा घटना घडल्या. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोटारी मात्र जळून खाक झाल्या. नामांकित कंपन्यांच्या या मोटारी अचानक पेट का घेतात, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता अग्निशामक दलाकडून व्यक्त आली असून खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चिंचवडच्या अ‍ॅटो क्लस्टर सभागृहासमोरच्या प्रशस्त रस्त्यावर सायंकाळी पाच वाजता  एका महागडय़ा मोटारीने अचानक पेट घेतला. वाहनचालक तत्काळ मोटारीतून बाहेर आल्याने बचावले. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा निष्कर्ष नंतर काढण्यात आला. रावेतला शाळेची बस पेटली होती. सुदैवाने त्यात विद्यार्थी नव्हते. त्यानंतर काळेवाडीत रस्त्यावरील एक मोटार पेटली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ताथवडय़ात रघुनंदनसमोर मोटारीला आग लागली. त्यानंतर पिंपरी त हॉटेल गोकुळसमोर रिक्षा जळाली. निगडीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीलाही आग लागली. क्षणार्धात मोटार जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच प्रसंगावधान राखून सर्व सदस्य मोटारीबाहेर पडू शकल्याने बचावले. काही दिवसांपूर्वीच, पिंपरी पालिकेसमोर प्रवाशी घेऊन निघालेल्या पीएमपी बसने पेट घेतला होता. तसाच प्रकार चिंचवडच्या मॉलसमोरही घडला होता. दोन्ही घटनेत बसमधील प्रवाशी तत्परतेने खाली उतरल्याने बचावले होते.

दुचाकीही असुरक्षित

चारचाकी वाहनांना आग लागण्याचे प्रकार होत असताना दुचाकीही सुरक्षित नसल्याचे चित्र पुढे आले आहे. गेल्या शनिवारी (२५ जानेवारी) आकुर्डीत सायंकाळी गर्दीच्या वेळी धावत्या दुचाकीला आग लागण्याचा प्रकार घडला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने पुढील प्रसंग टळला. थोडय़ाच वेळात दुचाकी जळून खाक झाली. या घटनेचे चित्रीकरण करण्यासाठी गर्दी झाली होती.

चालकांकडून सुरक्षिततेविषयक काळजी घेतली जात नाही. मोटार जुनी झाली तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही. इंजिनमधून आग लागते, नंतर ती इतरत्र पसरते. आग विझवण्याची साधनेही मोटारीत नसतात. हल्ली वातानुकूलित युनिट असतात, त्या ठिकाणी तांत्रिक समस्या उद्भवतात. धावत्या मोटारी पेटण्याचे प्रकार वाढतच आहेत. – किरण गावडे, मुख्य अग्निशामक अधिकारी, पिंपरी पालिका