लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : मावळ तालुक्यातील आंबेगाव-शिंदगाव येथे मानवी वस्तीत आलेल्या बिबट्याने एका ६० वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला. हल्ला झालेल्या व्यक्तीच्या मुलाने गावकऱ्यांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद केले. त्यामध्ये सहाजण जखमी झाले आहेत.

ज्ञानेश्वर श्रीपती राजीवडे ( वय ६०, आंबेगाव मावळ), भक्तिश्वर ज्ञानेश्वर राजीवडे (३०, आंबेगाव), प्रवीण रामभाऊ राजीवडे (३४, आंबेगाव, मावळ), गफूर पापा शेख (६५, कडधे मावळ), बाळू राधू शिंदे (४२, शिंदगाव मावळ), शत्रुघ्न रासकर अशी जखमींची नावे आहेत.

आंबेगाव-शिंदगाव येथे शुक्रवारी सकाळी बिबट्या आला. बिबट्या आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. नागरिकांनी घराचे दरवाजे बंद केले. श्वान भुंकल्याने बिबट्या घाबरला आणि सैरावैरा पळू लागला. ग्रामपंचायत कर्मचारी शिंदे यांच्यावर त्याने प्रथम हल्ला केला. त्यानंतर घाबरलेल्या बिबट्याने आणखी एकावर हल्ला केला आणि पळून गेला. नागरिकांनी बिबट्याचा सर्वत्र शोध सुरू केला. मात्र, बिबट्या कुठेही आढळला नाही. अखेर एका झाडाखाली थांबल्यानंतर श्वान वरच्या दिशेने भुंकू लागले. नागरिकांनी झाडावर पाहिले असता त्यांना बिबट्या दिसला.

वन विभागाला माहिती दिली. घाबरलेल्या बिबट्याने झाडावरून खाली येऊन ज्ञानेश्वर यांच्यावर हल्ला केला. त्यांचा मुलगा भक्तिश्वर यांनी बिबट्याला घेरले. ज्ञानेश्वर आणि भक्तिश्वर या पिता-पुत्राने नागरिकांच्या मदतीने बिबट्याला पकडले. जखमींना औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावातील लोकांनी दोरी आणून बिबट्याला बांधून ठेवले. वन विभागाचे पथक घटनास्थळी आल्यानंतर वन विभागाने बिबट्याची तपासणी केली. त्यानंतर त्याला बावधन येथे उपचारासाठी हलविण्यात आले.

नागरिकांवर गुन्हा

बिबट्याला पकडल्याप्रकरणी वन विभागाने वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे. बिबट्याला उघडपणे त्रास दिला असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे उप वनसंरक्षक महादेव मोहिते यांनी सांगितले.

बिबट्याने संरक्षणासाठी झाडावर आश्रय घेतला असावा. त्याला योग्य वेळ आणि जागा मिळाली असती, तर तो स्वतःहून जंगलात परतला असता. मात्र, खाली उतरल्यानंतर स्थानिकांनी त्याला दोऱ्या व जाळ्यांनी अडवले. ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक आहे. यामुळे प्राण्याला आणि लोकांना गंभीर इजा होऊ शकते, पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक मंगेश ताटे यांनी सांगितले.

बिबट्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. त्याला किरकोळ जखमा झाल्या आहेत. पथक त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवून असल्याचे रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष नेहा पंचमिया यांनी सांगितले.