स्केटिंग या क्रीडाप्रकाराची आवड असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. लोहगाव येथे स्केटिंग ट्रॅक साकारल्यानंतर महापालिकेतर्फे आता पद्मावती परिसरात स्केटिंग पार्क (स्केटिंग बोर्ड) साकारत असून, पन्नास ते साठ खेळाडू येथे एकाच वेळी सराव करत स्केटिंगचा आनंद आणि थरार अनुभवू शकतील.
पद्मावती येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाजवळच हे स्केटिंग बोर्ड बांधण्यात आले आहे. त्याची लांबी पंचवीस मीटर आणि रुंदी पंचवीस मीटर असून, महापालिका स्तरावर विकसित करण्यात आलेला हा देशातील पहिलाच स्केटिंग पार्क असल्याचे स्थानिक नगरसेवक आबा बागूल यांनी सांगितले. अशाप्रकारचा एक बोर्ड बंगळुरू येथे असून तो खासगी आहे. पुण्यात तयार करण्यात आलेल्या या स्केटिंग बोर्डसाठी अतिशय गुळगुळीत तक्तपोशी तयार करण्यात आली असून, एकाच वेळी पन्नास ते साठ खेळाडू येथे सराव करू शकतील. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडू तयार होऊ शकतील, अशाप्रकारे या बोर्डची बांधणी करण्यात आली आहे. या खेळाडूंनी प्रशिक्षण घेऊन स्पर्धामध्ये प्रावीण्य मिळवावे, यासाठी प्रशिक्षकांचीही व्यवस्था या ठिकाणी असेल. ‘ओपन टू स्काय’ अशाप्रकारच्या या स्केटिंग बोर्डमुळे पुण्याच्या क्रीडावैभवात भर पडणार आहे. स्केट पार्क खुल्या स्वरूपात असले, तरी पाऊस पडल्यानंतर पाणी राहणार नाही अशीही व्यवस्था करण्यात आली आहे. स्केट बोर्डलगतच प्रेक्षकांसाठी छोटे स्टेडियमही तयार करण्यात येत असून, खेळाडूंसाठीच्या अन्य सर्व आवश्यक व्यवस्थाही येथे उपलब्ध असतील. स्केटिंग बोर्डच्या बाजूने छोटा ट्रॅक व हिरवळीची सजावट असेल. हे सर्व काम पूर्ण होत आले आहे.
या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे काम प्रसिद्ध वास्तुरचनाकार आनंद उपळेकर यांनी केले असून, पुण्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प उपळेकर यांच्याच मार्गदर्शनातून साकारले आहेत. सहकारनगर भागात आतापर्यंत बागूल उद्यान, पं. भीमसेन जोशी कलादालन, संगीत कारंजे, फोर डी थिएटर, मल्टिमीडिया लेझर शो, सेव्हन वंडर पार्क, राजीव गांधी ई लर्निग स्कूल आणि नाटय़गृह असे विविध प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असून स्केट बोर्ड पार्क हा त्याचा पुढचा टप्पा ठरेल, असेही बागूल यांनी सांगितले.