पुणे : देशात माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पुण्यात आता अत्याधुनिक ‘फॅक्टरी ऑफ द फ्युचर’ची उभारणी केली जाणार आहे. यासाठी एसकेएफ इंडिया ही आघाडीची कंपनी ६५३ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ही नवीन उत्पादन सुविधा २०३० पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या निमित्ताने पुण्यातील निर्मिती क्षेत्राने अत्याधुनिक पाऊल टाकले आहे.

उद्योगांसाठी तंत्रज्ञान व उपाययोजना पुरवणारी कंपनी एसकेएफ इंडियाने पुण्यात अत्याधुनिक ‘फॅक्टरी ऑफ द फ्युचर’ उभारण्यासाठी ६५३ कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. नवीन उत्पादन सुविधा ‘लीन’, ‘क्लीन’ आणि पूर्णपणे डिजिटल पायाभूत सुविधांनी सुसज्ज असा असेल. या प्रकल्पात बुद्धिमान प्रणाली, रिअल-टाइम डेटा विश्लेषण, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान आणि स्वयंचलित उत्पादन प्रक्रिया यांचा समावेश असेल. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता, वेग, अचूकता आणि कार्यक्षमता यामध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. ही उत्पादन सुविधा २०३० पर्यंत सुरू होणार असून, भारतातील कंपनीच्या प्रगत उत्पादन क्षमतेला नवे बळ मिळणार आहे.

कंपनीच्या दीर्घकालीन धोरणानुसार हा प्रकल्प केवळ उत्पादनवाढीपुरता मर्यादित नसून, अधिक सक्षम, लवचिक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक उत्पादन साखळी निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. याबाबत कंपनीचे मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्स संचालक सुजीत पै म्हणाले की, भारत सध्या उत्पादन क्षेत्रात महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे आणि एसकेएफ इंडिया इंडस्ट्रियल या संधीचा लाभ घेत आघाडीवर राहील. ‘फॅक्टरी ऑफ द फ्युचर’ पूर्णपणे डिजिटल आणि शाश्वत तत्त्वांवर आधारित असेल. ऊर्जा बचत, स्थानिक उत्पादनवाढ आणि मजबूत पुरवठा साखळी (यावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्यामुळे भारत जागतिक उत्पादन केंद्र म्हणून अधिक सक्षम होईल.

पुण्यातील उत्पादन क्षेत्राला बळ

पुण्यात कंपनीची आधीपासूनच भक्कम उपस्थिती आहे. नवीन प्रकल्पामुळे विद्यमान उत्पादन सुविधांचे एकत्रीकर करण्यात येणार असून, त्यात नवीन सुविधांची भर घालण्यात येणार आहे. यातून अधिक विस्तारक्षम उत्पादन संरचना उभारली जाणार आहे. ऊर्जा, रेल्वे, धातू व खाण तसेच इतर अवजड उद्योग क्षेत्रांना जलद सेवा देण्यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे. देशात वाढत्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर या क्षेत्रांना उच्च दर्जाचे, वेगवान आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध उत्पादन महत्त्वाचे ठरणार आहे.