पिंपरी : ‘उद्योगांच्या गरजांनुसार कौशल्य प्रशिक्षण मिळाल्याने नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यामुळे विवाहानंतर करिअरमध्ये आलेल्या अडचणींवर मात करू शकलो. व्यावसायिक जीवनात प्रवेश करण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाल्याची भावना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कौशल्य विकास कार्यक्रमातून प्रशिक्षण घेतलेल्या आणि महिला बचत गटांमार्फत चालविण्यात येणाऱ्या सखी आंगन प्रकल्पातील महिलांनी व्यक्त केल्या.
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव देवाश्री मुखर्जी यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील कौशल्यविकास, रोजगारनिर्मिती व महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना भेट दिली. महापालिकेच्या सखी आंगन, कौशल्यम् प्रकल्पाची माहिती घेतली. महिलांशी संवाद साधला.
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त अमित सैनी, महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, प्रादेशिक संचालक चेंगोटी मूर्ती, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त ममता शिंदे यांच्यासह बचत गटातील महिला या वेळी उपस्थित होत्या.
महापालिकेचा समाज विकास विभाग आणि लाइटहाऊस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या निगडी येथील ‘कौशल्यम्’ (लाइटहाऊस) प्रकल्पास अधिकाऱ्यांनी भेट दिली. या केंद्रामध्ये राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमांची माहिती घेण्यात आली. या वेळी प्रशिक्षणार्थी युवक व महिलांशी संवाद साधत त्यांनी प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी, कौशल्यविकासाची दिशा आणि आत्मविश्वास वृद्धीबाबत मुखर्जी यांनी अनुभव जाणून घेतले.

विविध उत्पादनांची निर्मिती
आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ महिला बचत गटांमार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘सखी आंगन’ या प्रकल्पास अधिकाऱ्यांनी भेट दिली. ४९ गाळ्यांच्या या संकुलामध्ये महिला बचत गटांकडून फूड व नॉन-फूड अशा दोन प्रवर्गांत विविध उत्पादनांची निर्मिती, प्रक्रिया, पॅकेजिंग व थेट विक्री केली जाते. येथे नाश्ता व जेवणाचे पदार्थ, पापड, लोणची, मसाले, तयार खाद्यपदार्थ, बेकरी उत्पादने, हस्तकला साहित्य, सजावटीच्या वस्तू, कापडी पिशव्या, अगरबत्ती तसेच सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित वस्तूंची विक्री करण्यात येते.
सखी आंगन प्रकल्पामुळे महिला बचत गटांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळत आहे. मध्यस्थांची साखळी टळल्याने महिलांना अधिक आर्थिक लाभ होत आहे. केवळ विक्रीपुरते मर्यादित न राहता आर्थिक व्यवहार, विपणन, ग्राहकसंवाद आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण महिलांना या प्रकल्पातून मिळत असल्याने अनेक महिला रोजगार देणाऱ्या उद्योजक म्हणून पुढे येत आहेत, असे समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे यांनी सांगितले.
