पुणे : नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींच्या अनुषंगाने न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये तंत्रशिक्षणाचे कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. रोजगाराभिमुख विद्यार्थी घडवण्यासाठी पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना नाट्यशास्त्र, जपानी आणि जर्मन या परदेशी भाषा, रोबोटिक्स, संगणक जोडणी असे अभ्यासक्रम राबवण्यात येत आहेत. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. संस्थेच्या नियामक परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, शाला समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक पलांडे, सदस्य डॉ. आशिष पुराणिक, मुख्याध्यापक सुनील शिवले, दिलीप रावडे आदी या वेळी उपस्थित होते. प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षात माजी विद्यार्थ्यांनी 12 लाख 44 हजारांची देणगी शाळेला दिली, तसेच ज्येष्ठ उद्योगपती डॉ. प्रमोद चौधरी यांनी एक कोटी सव्वीस लाखांची देणगी दिली. या देणगीतून शाळेत सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे वीज निर्मिती, स्मार्ट बोर्ड, स्थानिक आंतरजाल जोडणी आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.  तंत्रशिक्षणाच्या कौशल्य अभ्यासक्रमांचा समावेश शालेय वेळापत्रकात करण्यात आला आहे. देणगीद्वारे उपलब्ध झालेल्या निधीतून कौशल्य अभ्यासक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आल्याचे शिवले यांनी नमूद केले. शालेय जीवनापासून विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजेत. पदवीला व्यावसायिक अभ्यासक्रमाची जोड मिळाली पाहिजे. तरच विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील या विचारातून तंत्रशिक्षणाचे कौशल्य अभ्यासक्रम राबवण्यात येत आहेत, असे डॉ. कुंटे यांनी सांगितले. कुलकर्णी म्हणाले, की नव्या शैक्षणिक धोरणाअंतर्गत शिक्षण पूरक कौशल्य विकासावर भर आहे. त्यातून रोजगाराभिमुख विद्यार्थी घडतील.