राज्यातील तंत्रशिक्षण संस्थांमध्येही आता कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू होणार असून त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने महाविद्यालयांकडून अर्ज स्वीकारले आहेत. नियमित अभ्यासक्रमाची वेळ संपल्यानंतर कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कौशल्य विकासासाठी केंद्र शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहेत. त्या अतंर्गत आता अभियांत्रिकी महाविद्यालये आणि तंत्रनिकेतनांनाही कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांना अतिरिक्त सुविधा फारशा उभाराव्या लागणार नाहीत. उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा यासाठी वापरता येणार आहेत. त्याचप्रमाणे उपलब्ध शिक्षकांनाही काही मानधन देऊन या अभ्यासक्रमाच्या अध्यापनासाठी वापरता येणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एआयसीटीईकडून पात्रतेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महाविद्यालयांकडून अर्जही घेण्यात आले असून नव्या शैक्षणिक वर्षांपासून कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू होऊ शकतील.
बाजारपेठेची गरज आणि राष्ट्रीय कौशल्य विकास प्राधिकरणाने दिलेल्या अभ्यासक्रमानुसार कौशल्य विकास अभ्यासक्रमाची रचना महाविद्यालये करू शकतात. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबरच बाहेरील विद्यार्थ्यांनाही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याची मुभा आहे. तंत्रशिक्षण संस्थांमध्ये कौशल्य विकास अभ्यासक्रम चालवण्यासाठी केंद्र शासनाकडून निधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. खासगी संस्था, कंपन्या यांच्या सहकार्यानेही हा अभ्यासक्रम चालवता येणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू केल्यानंतर मात्र दर सहा महिन्यांनी त्याचा प्रगती अहवाल महाविद्यालयांनी एआयसीटीईला द्यायचा आहे.