त्वचेची निगा राखण्याबाबत जागृती करण्यासाठी सप्टेंबर हा महिना निश्चित करण्यात आला. त्वचेची योग्य निगा राखल्यास तिचा मृत्युपश्चातही उपयोग होऊ शकतो. तो कसा, त्वचादान म्हणजे काय, याबाबत ‘कुमुदिनी ट्रस्ट’च्या संस्थापक-अध्यक्ष डाॅ. रोहिणी आठवले यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद.
भाजलेल्या रुग्णांसाठी काही करावे असे कधी वाटले?
योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे भाजलेल्या रुग्णांचा मृत्यू होतो. या समस्येची जाणीव मला झाली ती माझ्या आईच्या मृत्यूमुळे. भाजल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल केले गेले, पण चुकीचे सल्ले आणि अयोग्य मार्गदर्शनाचा फटका आमच्या कुटुंबाला बसला. या सगळ्या घटनांमुळे मला नैराश्य तर आलेच; पण त्या प्रसंगाने मला विचार करायलाही प्रवृत्त केले. त्यामुळे, भाजण्याचे अपघात नक्की कसे होतात, त्यातील रुग्णांवर कशा प्रकारे उपचार केले जातात, यावर मी अभ्यास करायला सुरुवात केली. तेव्हा असे लक्षात आले, की मुळात भाजलेल्या रुग्णांवरील उपचार पद्धतीतच त्रुटी आहेत आणि त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी भाजलेल्या रुग्णांना सर्व प्रकारे मदत करण्यासाठी २०१८ मध्ये ‘कुमुदिनी मेमोरिअल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली.
ट्रस्टद्वारे कशा प्रकारचे कार्य केले जाते?
आगीमुळे अपघात होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आवश्यक आहे. त्यामुळे बरेचसे अपघात टाळता येऊ शकतात. त्यासाठी ट्रस्टतर्फे वस्ती विभागांमध्ये सर्वेक्षण आणि जनजागृतीचे कार्य केले जाते. दिवाळीत फटाक्यांमुळे आग लागणे किंवा भाजण्याचे प्रमाण खूप जास्त आहे; म्हणून दिवाळीपूर्वी वस्ती विभागांमध्ये प्रबोधनाचे काम केले जाते. विजेवरची उपकरणे, वायरिंग यांची योग्य देखभाल केली, तर शॉर्टसर्किटमुळे होणारे अपघात टळू शकतात. उकळते पाणी, दूध, आमटी, तेल अंगावर सांडणे असे अपघात होऊ नयेत म्हणून थोडीशी काळजी घेतली, तर ते नक्कीच टाळता येतात. ही जागृती करण्यासाठी आम्ही पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी अग्निप्रतिबंधक उपाय आणि प्रथमोपचार अशी व्याख्याने आयोजित करतो. गेल्या महिनाभरात, पुण्यातील पाच शाळांमधील एक हजार विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारांसाठी मदत, मानसिक आधारासाठी समुपदेशन आणि त्वचादानाविषयी जनजागृती ही कामे आम्ही करतो.
त्वचादान कशा प्रकारे करता येऊ शकते?
सर्व माणसांच्या त्वचेची रचना सारखीच असते. त्यामुळे कोणाचीही त्वचा कोणालाही चालू शकते. मृत्युपश्चात १८ वर्षांवरील कोणतीही निरोगी व्यक्ती त्वचादान करू शकते. त्वचादान मृत्यूनंतर सहा तासांच्या आत होणे आवश्यक आहे. यामध्ये फक्त पाठीवरील आणि दोन्ही मांड्यांवरील त्वचा काढली जाते. त्वचेचा वरचा अतिशय पातळ एक अष्टमांश थर काढला जातो. यासाठी पुण्यामध्ये सूर्या हॉस्पिटलमध्ये त्वचापेढी आहे. सूर्या स्किन बँकेच्या ९८९०९५५५५१ या हेल्पलाइनवर दूरध्वनी केल्यास तेथून वैद्यकीय चमू मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरी येतात आणि साधारणपणे पाऊण तासात ते मृत व्यक्तीची त्वचा काढून घेऊन जातात. यासाठी कोणताही अर्ज आधी भरून ठेवण्याची आवश्यकता नसते. मृत्यूचा दाखला (डेथ सर्टिफिकेट) आणि वारसांचे संमतिपत्र दिल्यास त्वचादान होऊ शकते. या त्वचेचा उपयोग भाजलेल्या रुग्णांवरील उपचारांमध्ये होतो. यामुळे त्यांच्या जखमा लवकर भरून येतात आणि त्यांच्या वेदनाही कमी होण्यास मदत होते.
भाजलेल्या रुग्णांना काय काळजी घ्यावी लागते?
भाजण्याचा जखमा दीर्घ काळ बऱ्या होत नाहीत. त्यामुळे या रुग्णांना बराच काळ रुग्णालयात राहावे लागते. उपचारही खर्चीक असतात. जे रुग्ण ४० ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाजलेले असतात त्यांच्यासाठी ‘बर्न-वॉर्ड’ असलेल्या रुग्णालयामध्येच उपचार केले जातात. कारण या रुग्णांमध्ये जंतुसंसर्गामुळे दगावण्याचे प्रमाण जास्त असते. पुण्यामध्ये ससून रुग्णालय आणि सह्याद्री, सूर्या हॉस्पिटलमध्ये ‘बर्न वॉर्ड’ आहेत. गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांसाठी पहिला तास हा ‘गोल्डन अवर’ समजला जातो, त्याचबरोबर पहिले २४ तास अत्यंत महत्त्वाचे असतात. त्या वेळात रुग्णालयामध्ये दाखल करून तातडीने उपचार सुरू केल्यास रुग्ण वाचण्याचे प्रमाण वाढते.
shriram.oak@expressindia.com
