पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच उर्से गावच्या हद्दीत जवळपास दीड किलोमीटर अंतरापर्यंत शेकडो झाडांची कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. रात्रीच्या वेळी अज्ञात २५ जणांकडून ही कत्तल झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली असतानाही शासकीय यंत्रणा पूर्णपणे अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.

मुंबईहून पुण्याकडे जाताना उर्से गावाच्या हद्दीत द्रुतगती मार्गाला खेटून असलेल्या जमिनीवरील शेकडो मोठी झाडे कापून नेण्यात आली आहेत. काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. रात्रीच्या वेळी मशिन तसेच कटरच्या साहाय्याने झाडे तोडण्यात आली आहेत. जवळपास दीड किलोमीटर अंतरापर्यंत झाडे कापल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

रहदारीसाठी नियमितपणे या जागेचा वापर करणाऱ्या ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी पर्यावरणप्रेमींना याबाबतची माहिती दिली. पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केली असता, बेकायदेशीरपणे शेकडो झाडे तोडून निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. झाडांची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करावी, या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि शासकीय यंत्रणेच्या अनास्थेची दखल घ्यावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.