सगळीकडेच सर्व्हेलन्स आहे. आवड-निवड ठरवली जातेय. आक्रमण थेट मेंदूवर होतेय. अचानक नाही, टोळ्यांचा समाज झाल्यानंतर हजारो वर्षांपासून तेच सुरू आहे. नि त्याची गोष्टही. अभ्यासक, परीक्षक, भाष्यकार… व्यक्त होणारे जाणते चौका-चौकात तेच सांगतायेत. पात्रे बदलतात. नि व्यवहारानुसार भाषाही. कान तशी भाषा. पण, गोष्ट सुरूच असते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लवकरात लवकर पुढे जाण्याचा प्रयत्न, ही त्यातली मेख. पण, तीच ती गोष्ट ऐकून कंटाळलेल्यांना काही तरी नवे हवे आहे. त्यांना निसर्गाच्या जवळ जायचे आहे. वेगवान बदल नकोत, तर शांतपणे बसायचे आहे. इथून पुढचा प्रवास हळूवारपणे टिपायचा आहे. ‘मला कासव म्हणून जगायची आहे,’ ‘पिफ’च्या पाचव्या दिवशी उमटलेली ही प्रतिक्रिया या ‘स्लो मूव्हमेंट’ची कल्पना द्यायला पुरेशी.

‘स्पाइंग स्टार्स’ या सिनेमानंतर श्रीलंकेतील दिग्दर्शक विमुक्थी जयसुंदरा आणि प्रेक्षाकांमध्ये घडलेला हा संवाद. वडिलांचे निधन झाल्यानंतर, आपण काही तरी गमावतो आहे, ही जग जिंकायला गेलेल्या शास्त्रज्ञाची भावना जयसुंदरा यांनी टिपली. कासवाच्या गतीने पुढे सरकणाऱ्या या सिनेमाची एकेक फ्रेम पृथ्वीचे प्रेमगीत सांगते. ते पाहायला झालेली गर्दी, त्यानंतर ‘आपण सगळेच या ‘स्लो मूव्हमेंट’चा भाग होऊ,’ अशी दिग्दर्शकाने घातलेली साद ‘पिफ’मध्ये काय चाललेय हे सांगायला पुरेशी.

विदेशातून पाहुणे येतात, मोठमोठे दिग्दर्शक येतात. त्यांना प्रेम मिळतेच, पण हा जथ्था त्यांचे प्रश्न सिनेमात शोधायला आलेला. त्यामुळे पडद्याबाहेरच्या रांगा कमी होत नाहीत अन् प्रश्नही. अफ्रिकेतल्या काही टोळ्यांनी इजिप्तमध्ये आणलेली आणि घरकामगार म्हणून काम करणारी स्त्री भरडली जाते. तिचे प्रश्न वेगळे, गुंता वेगळा. भीती आणि मूल्यांचा संघर्ष अधिक घनघोर होतो. मात्र, एक दिवस ती कंटाळते. टोळीतल्या एकाला इथून पुढे ऐकणार नाही, असं सांगते. तिची घुसमट पाहून आपल्याकडे जरा बरंच आहे, अशी प्रतिक्रिया उमटायला वेळ लागत नाही. थिएटरातून बाहेर पडता पडता मात्र एक फ्रेम पुन्हा समोर येते. त्याने तिला गाडीवर का सोडले असेल? अरेच्चा!… अजून रात्र झाली नाही. या एका फ्रेममधून तिच्या नि त्याच्या नात्याचा ओलावा टिपल्याचा आनंद एका जाणत्या प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहतो. सिनेमा लवकर संपला, गोष्ट अजून बाकी आहे.

इराणी सिनेमे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, हे काही नवीन नाही. गोष्टीत दम असतो, प्रत्येक फ्रेममध्ये गट्स असतात. नवऱ्यानंतर त्याच्या भावाची मालकी असलेल्या बाईच्या वाट्याला मरणच येतं. परंपेरेनं प्रत्येक बाईच्या वाट्याला येणारं दुखणं आपल्या समाजात नवा ‘लूप’ निर्माण करतो आहे, हे सांगण्याची हिमंत असलेला अब्बास रफी यांचा ‘ड्रीम ऑफ लिबरेशन’ दाद मिळवतो. ही ‘विलंबित चळवळ’ सर्व प्रकारच्या सत्तेला सुरूंग लावते आहेत. ‘पिफ’च्या प्रत्येक दिवसात ती मोकळी होते आहे. अजून पूर्ण सपाटीकरण झालेले नाही. ‘मला कासव म्हणून जगायचे आहे,’ ही व्यक्त झालेली प्रतिक्रिया महोत्सवाच्या शेवटाचा मार्ग प्रशस्त करते आहे…

दिवसाच्या मध्यंतरानंतर मराठी चित्रपट स्पर्धेतील रमेश मोरे, मोहित टाकळकर, जिजीविषा काळे, रविंद्र माणिक जाधव, संतोष डावखर, मनोज नाईक साटम आणि समीर तिवारी या दिग्दर्शकांबरोबर ‘पिफ’चे उपसंचालक विशाल शिंदे यांनी संवाद साधला, त्या वेळी, ‘प्रत्येक अडचणींवर मार्ग मिळतो, आपले आहे, ते सच्चेपणाने सांगा,’ हा नव्या दिग्दर्शकांनी दिलेला सल्ला या ‘स्लो मूव्हमेंट’ची खात्री देणारा.

आजचे चित्रपट

  • एल : सकाळी १०.०० (पीव्हीआर)
  • लूझ : दुपारी १२.१५ (पीव्हीआर)
  • नो अदर चॉइस : दुपारी १.०० (ई-स्केअर)
  • ॲट वर्क : दुपारी २.४५ (पीव्हीआर)
  • ब्लू मून : दुपारी ३.२० (ई-स्केअर)
  • माया : दुपारी १२.४० (एनएफए)
  • विजय तेंडुलकर मेमोरिअल लेक्चर, बी. जयमोहन (तमिळ लेखक) : दुपारी ३.३०