‘स्मार्ट’ प्रचाराचा बोलबाला!

महापालिका निवडणुकीसाठीही हायटेक प्रचाराकडे इच्छुक उमेदवारांचा कल आहे.

इव्हेंट कंपन्यांचे इच्छुकांपुढे सादरीकरण

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांचा समावेश झाला आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमध्ये स्मार्ट सिटी योजनेचा बोलबाला असून स्मार्ट मतदारांवर छाप पाडण्यासाठी स्मार्ट प्रचार करणे ही उमेदवारांची गरज झाली आहे. ही गरज ओळखून उमेदवारांचा जाहीरनामा, कार्यअहवाल, मतदारयादी अशा अनेक आवश्यक बाबी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून उपलब्ध करून देणाऱ्या इव्हेंट कंपन्या सध्या इच्छुक उमेदवारांकडे पाठपुरावा करत आहेत. इच्छुकांनीही पारंपरिक प्रचाराबरोबरच हायटेक प्रचारासाठी उमेदवारीचा कानोसा घेत विविध कंपन्यांचे सादरीकरण आणि त्यांची पॅकेजेस अजमावण्यास सुरुवात केली आहे.

महापालिका निवडणुकीसाठीही हायटेक प्रचाराकडे इच्छुक उमेदवारांचा कल आहे. सर्वच पक्षांमधील इच्छुक त्यासाठी संगणक अभियंते आणि संगणक कंपन्यांच्या संपर्कात आहेत. उमेदवारांची गरज ओळखून त्यांना प्रचारासाठी आवश्यक असलेली संगणक प्रणाली, तसेच प्रचारासाठी विविध समाजमाध्यमे, प्रभागाचे सर्वेक्षण, वैयक्तिक अ‍ॅँड्रॉईड अ‍ॅप, सर्जनशील प्रचार योजना, ध्वनी संदेश व कॉल, एसएमएस अशा अनेक बाबी एका पॅकेजमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

मतदार याद्या, निवडणुकीसाठीचे सर्वेक्षण, उमेदवाराच्या आवाजामध्ये प्रचार संदेश, एसएमएसद्वारे सभा, कार्यक्रम यांच्या वेळा कळवणे यासाठीही सॉफ्टवेअर विकसित करण्यात आली असून त्या सेवा त्या माध्यमातून पुरविण्यात येत आहेत.

तसेच उमेदवाराने केलेल्या कामांचा आढावा, विविध कामांची माहिती देणारी व्हिडिओ क्लिप, केलेल्या कामांची छायाचित्रे आदी अनेक बाबींचे एकत्रिकरण करूनही अ‍ॅप तयार करून दिले जात आहे. प्रचाराच्या या सर्व सेवा मराठी व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे इव्हेंट कंपन्यांच्या प्रतिनिधींनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. सध्या या कंपन्यांचे प्रतिनिधी इच्छुक उमेदवारांकडे पाठपुरावा करत असून उमेदवाराला प्रचारासाठी कोणकोणत्या सुविधा ते देऊ शकतात, याचे सादरीकरण उमेदवारांकडे करत आहेत.

‘राज्यकर्ता’ हे आमचे सॉफ्टवेअर विकसित करून गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही या व्यवसायात आहोत. अनेक निवडणुकांचा आम्हाला अनुभव आहे. निवडणुकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील दहा महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व निवडणुकांसाठी आमच्याकडे विचारणा होत आहे. पुण्यातील दोनशे तर पिंपरी-चिंचवडमध्ये दीडशे इच्छुकांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, असे अ‍ॅडमार्क मल्टिमिडीयाचे मिलिंद दरेकर यांनी सांगितले.

हायटेक प्रचारात काय काय..

  • मतदार याद्या तसेच उमेदवाराच्या आवाजातील प्रचार संदेश
  • उमेदवाराने केलेल्या कामांची माहिती देणारी व्हिडिओ क्लिप
  • उमेदवाराला उपयुक्त होईल असे अ‍ॅप
  • उमेदवाराच्या आवाजातील ध्वनिसंदेश व कॉल
  • प्रचारासाठीचे एसएमएस

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Smart camping in election