scorecardresearch

स्मार्ट सिटी योजनेचा पंचनामा व्हावा ; माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी

यासंदर्भात मोहन जोशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून शहरात करण्यात आलेल्या कामांची चौकशी व्हावी आणि योजनेचा पंचनामा पुणेकरांपुढे मांडावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

यासंदर्भात मोहन जोशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरु नागरी पुनर्निर्माण मिशन ( जेएनएनयूआरएम ) अंतर्गत शहरात १ हजार ५०० कोटींहून अधिक विकास कामे झाली. मात्र मनमोहन सिंग सरकारची ही उपयुक्त योजना बंद पाडून मोदी सरकारने स्मार्ट सिटी सारखी फसवी योजना आणली. पंतप्रधान मोदी यांनी मोठा गाजावाजा करून स्मार्ट सिटी योजनेचे उदघाटन पुण्यात केले. मात्र पुण्यासह देशभरातील १०० शहरांमध्ये योजना अपयशी ठरली आहे. याकरिता या योजनेच्या यशापयशाचा पंचनामा होणे गरजेचे आहे, असे मोहन जोशी यांनी निवेदनात म्हटले आहे.

स्मार्ट सिटी योजनेचा पहिला टप्पाही पुण्यात यशस्वी झालेला नाही. केंद्र सरकारच्या या योजनेसाठी महापालिका आणि खासदार निधीचा वापर करण्यात आला आहे. त्याचा विनियोग कसा करण्यात आला? त्यातून कोणती कामे झाली? याची चौकशी होणे गरजेचे आहे. योजना अपयशी ठरत असल्याचे जाणवल्यावर केंद्र सरकारने योजना गुंडाळण्याचा प्रयत्न केला होता. त्याविरोधात काँग्रेसने आवाज उठवला होता, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Smart city plan enquiry demand former mla mohan joshi chief minister uddhav thackeray amy

ताज्या बातम्या