Smoke from below coach of Pune-Mumbai Pragati Express | Loksatta

पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असल्याने त्यावर ठोस उपाययोजनांची प्रवाशांकडून मागणी

पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेसच्या डब्याखालून धूर; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस (संग्रहित छायाचित्र)

पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या प्रगती एक्स्प्रेसच्या डब्याखालून शनिवारी मळवली स्थानकाजवळ धूर निघू लागल्याने प्रवाशांमध्ये काही वेळ घबराट निर्माण झाली होती. गाडी लोणावळा स्थानकावर आल्यानंतर अग्निशमन यंत्रणेच्या सहाय्याने धूर थांबविण्यात आला. काही तांत्रिक गोष्टींमुळे असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होत असल्याने त्यावर कायमची आणि ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा- पुण्यातील तरुणाचा भन्नाट प्रयोग; चक्क कंटेनरमध्ये घेतले काश्मिरी ‘केशर’चे पीक

पुणे स्थानकावरून प्रगती एक्स्प्रेस निघाल्यानंतर ती पुणे रेल्वेच्या हद्दीत असलेल्या मळवली स्थानकावर पोहोचली. कामशेत ते मळवली स्थानकादरम्यान एक्स्प्रेसच्या सी-१ या क्रमांकाच्या डब्याखालून धूर निघत असल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. डब्याच्या खालील बाजूस आग लागली असल्याची शंका प्रवाशांमध्ये होती. कामशेत स्थानकाकतून गाडी पुढे गेल्यानंतर ती लोणावळा स्थानकात थांबविण्यात आली. या ठिकाणी अग्निशंमक यंत्रणेच्या माध्यमातून डब्याखालून निघणारा धूर बंद करण्यात आला. त्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली.
रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, गाड्यांना सध्या नव्या रचनेचे डबे बसविण्यात आले आहे. या डब्यांच्या चाकाजवळच्या भागामध्ये फायबरचा उपयोग करण्यात आला आहे. घर्षण झाल्यानंतर काही वेळेला या भागातून धूर निघू लागतो. ही तांत्रिक बाब असली, तरी त्यामुळे प्रवाशांमध्ये घबरात निर्माण होते. सातत्याने होणाऱ्या या प्रकारांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही शहा यांनी केली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 23:20 IST
Next Story
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचा छत्रपती संभाजीराजेंच्या समाधिस्थानी आत्मक्लेश