scorecardresearch

नळस्टॉप उड्डाणपुलावर वाहतूक सुसाट; पुलाखाली मात्र वाहतुकीचा बोजवारा

नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि मेट्रो मार्गिकेसाठी दुमजली उड्डाणपूल (डबल डेकर) बांधण्यात आला असला तरी दुहेरी उड्डाणपुलाखालून जाणारा कर्वे रस्ता अरूंद झाल्याने नळस्टॉप ते एसएनडीटी महाविद्यालयापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे.

पुणे : नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि मेट्रो मार्गिकेसाठी दुमजली उड्डाणपूल (डबल डेकर) बांधण्यात आला असला तरी दुहेरी उड्डाणपुलाखालून जाणारा कर्वे रस्ता अरूंद झाल्याने नळस्टॉप ते एसएनडीटी महाविद्यालयापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. उड्डाणपुलावरील वाहतूक सुसाट झाली असली तरी पुलाखाली वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने वाहनचालकांना कोंडीतून मार्ग काढावा लागत आहे.
कर्वे रस्त्यावर मेट्रो मार्गिका सुरू करण्यात आली. मेट्रो मार्गिका सुरू करण्यापूर्वी नळस्टॉप चौकातील कोंडी दूर करण्यासाठी तेथे दुमजली उड्डाणपूल बांधण्यात आला. उड्डाणपुलामुळे कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकापासून थेट एसएनडीटी महाविद्यालयापर्यंत वाहनचालकांना सुसाट जाणे शक्य झाले तसेच एसएनडीटी महाविद्यालयापासून कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्य चौकापर्यंत वाहनचालक पोहचू लागले. उड्डाणपुलामुळे नळस्टॉप ते एसएनडीटी महाविद्यालयापर्यंतच्या वाहतुकीचा वेग वाढला. मात्र, उड्डाणपुलामुळे नळस्टॉप चौक ते एसएनडीटी महाविद्यालया दरम्यान असलेल्या कर्वे रस्त्यावरील दोन मार्गिका पूर्णपणे व्यापल्या गेल्या असून वाहनचालकांच्या वापरासाठी सहा ते आठ फूट रुंदीचा रस्ता राहिला आहे.
दुहेरी उड्डाणपुलाच्या कामकाजामुळे एसएनडीटी महाविद्यालय, आठवले चौक,
विधी महाविद्यालय रस्ता ते नळस्टॉप चौक दरम्यान गेल्या दोन वर्षांपासून चक्राकार वाहतूक योजना राबविण्यात आली. उड्डाणपुल तसेच मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे वाहनचालकांना कोंडीबाबत तक्रार करण्यास वाव नव्हता. मात्र, उड्डाणपूल, मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडीची समस्याही समोर आली.
समस्या नेमकी काय?
नळस्टॉप चौकातून एसएनडीटी महाविद्यालय, कर्वे रस्ता, पौड रस्त्याकडे जाणाऱ्या पीएमपी बस उड्डाणपुलाखालील रस्त्याचा वापर करतात. नळस्टॉप चौक ते एसएनडीटी चौक दरम्यान असलेल्या कर्वे रस्त्यालगत निवासी भाग तसेच शाळा आहेत. उड्डाणपुलाखालील रस्त्याचा वापर करून अनेक रहिवासी एरंडवणे भागात जातात. नळस्टॉप चौक ते एसएनडीटी महाविद्यालय दरम्यानचा रस्ता अरूंद झाला आहे. या रस्त्यावर पीएमपी थांबा आहे. पीएमपी बस थांब्यावर थांबल्यानंतर वाहतूक कोंडी होती तसेच एकापाठोपाठ दोन ते तीन पीएमपी बस कर्वे रस्त्याने गेल्यास कोंडीत भर पडते. बस थांब्यावर थांबणारे प्रवासी तसेच पादचाऱ्यांना या भागातून चालणे देखील अवघड झाले आहे. पदपथ अरूंद असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून उड्डाणपुलाखालील रस्त्यावरून जावे लागते.
कोथरूड, पौड रस्त्याकडे जाणाऱ्या पीएमपी बस या उड्डाणपुलाखाली रस्त्याचा वापर करतात. नळस्टॉप चौक ते एसएनडीटी महाविद्यालय दरम्यान निवासी भाग आहे. या भागातील रहिवासी या उड्डाणपुलाखालील रस्त्याचा वापर करतात. दुहेरी उड्डाणपुलामुळे कर्वे रस्ता अरूंद झाला असूनकोंडी होत आहे. या भागात पीएमपी थांबे आहेत. एकापाठोपाठ येणाऱ्या पीएमपी बसमुळे कोंडीत भर पडते. कोंडी सोडविण्यासाठी नळस्टॉप चौक, एसएनडीटी महाविद्यालय दरम्यान वाहतूक पोलीस ठेवण्यात आले आहेत. – जयराम पायगुडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोथरूड वाहतूक विभाग

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Smooth traffic nalstop flyover under the bridge traffic congestion amy

ताज्या बातम्या