पुणे : एसएनडीटी महिला विद्यापीठाने बुद्धिबळाचा समावेश औपचारिक शिक्षणात करण्याचे पाऊल टाकले आहे. त्यानुसार पदवीपूर्व स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी बुद्धिबळाचा दोन श्रेयांकांचा अभ्यासक्रम राबवण्यात येणार असून, बुद्धिबळतज्ज्ञ, संशोधक डॉ. मकरंद वेलणकर यांच्या सहकार्याने अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्य विकसन, गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण संधीसाठी एसएनडीटी महिला विद्यापीठात चेतना (सेंटर फॉर होलिस्टिक एज्युकेशन, ट्रेनिंग अँड नोव्हेल ॲडव्हान्स्डमेंट) या केंद्र कार्यरत आहे. बुद्धिबळाच्या श्रेयांक अभ्यासक्रमासाठी एनएनडीटी महिला विद्यापीठ चेतना, वेलणकर चेस इन्स्टिट्यूट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. एकूण ३० तासांचा हा अभ्यासक्रम मराठी, इंग्रजी भाषेत ऑनलाइन पद्धतीने शिकवला जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २ श्रेयांकांसह प्रमाणपत्र, तर अन्य सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. बुद्धिबळाचा पदवीपूर्व स्तरावर औपचारिक अभ्यासक्रम सुरू करणारे एसएनडीटी महिला विद्यापीठ राज्यातील पहिलेच विद्यापीठ ठरणार आहे.

बुद्धिबळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, सारासार विचार, विश्लेषणात्मक क्षमता, आत्मविश्वास, निर्णयक्षमता अशा क्षमता विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत बुद्धिबळ शिक्षण पोहोचवणे शक्य होणार आहे, असे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या चेतना केंद्राचे संचालक डॉ.महेश कोलतमे यांनी सांगितले.

वेलणकर चेस इन्स्टिट्यूटचे डॉ. मकरंद वेलणकर म्हणाले, “बुद्धिबळाकडे केवळ स्पर्धात्मक खेळ म्हणून न पाहता, व्यक्तिमत्त्व विकास आणि जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारे प्रभावी माध्यम पाहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक क्षमता विकसित करण्यासाठीची शैक्षणिक चौकट बुद्धिबळाच्या औपचारिक अभ्यासक्रमाद्वारे निर्माण होऊ शकणार आहे.

डॉ. मकरंद वेलणकर १९८६ पासून बुद्धिबळ प्रशिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यातील पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ पंच म्हणून त्यांची ओळख आहे, तसेच त्यांनी बुद्धिबळ या विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांनी ‘चेस फॉर सेल्फ-डेव्हलपमेंट’ हा अभ्यासक्रम विकसित केला असून, बुद्धिबळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारी ‘चेस थेरपी’ ही अभिनव संकल्पना विकसित केली आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान पहिल्या तुकडीचे प्रवेश

पहिल्या तुकडीचा कालावधी डिसेंबर ते फेब्रुवारी असा नियोजित आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणी https://sndtwuchetna.ac.in/ दुव्याद्वारे करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.