करोना विषाणूला हद्दपार पार करण्यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर काम करताना दिसत आहे. तर सराकारी आदेशाचे काटेकार पालन व्हावे व नागरिक घरांमध्ये सुरक्षित राहवे यासाठी दिवसरात्रं कर्तव्य निभावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आज अवघा देश पाहतो आहे. मात्र आपल्या कर्तव्याबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपाण्याचे कौतुकास्पद कार्य पुणे पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल हर्षला खाडे करत आहेत.

त्या त्यांच्या हद्दीतील झोपडपट्टी भागातील 200 नागरिकांना दररोज जेवणाचे पॅकेट देण्याच काम करत आहेत. तर हर्षला यांचे पती सैन्य दलात 15 वर्षांपासून देशाची सेवा करत आहेत. त्यामुळे एका बाजूला पती सैन्य दलात राहून व दुसर्‍या बाजूला पत्नी पोलीस विभागात कर्तव्य बजावून देश सेवा करत आहेत. आजच्या कठीण काळात सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून हर्षला खाडे आज गरजवंतांचे पोट भरण्याचे काम करत आहेत. यामुळे हर्षला यांचे पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे.

करोना विषाणूमुळे जगभरात लाखो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. आपल्या देशातही या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आले होते. मात्र राज्यात आता हा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे अनेक नागरिक आहे  त्या ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यातील बर्‍याच जणांचे खाण्या पिण्याचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासना मार्फत अन्न-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र तरी देखील  काही नागरिकांना जेवण मिळत नसल्याचे समोर आले आहे. अशा नागरिकांना पोलीस कर्मचारी आणि विविध संस्था जेवण देताना दिसत आहेत. याचाच एक भाग म्हणून पुण्यातील मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमधील कॉन्स्टेबल हर्षला खाडे या ड्युटी संभाळून, त्यांच्या हद्दीत झोपडपट्टी भागात जेवणाचे पॅकेट वाटण्याचे काम करत आहेत. या त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले जात आहे.

याबाबत हर्षला खाडे यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या,  करोना विषाणूचे ज्यावेळी आपल्याकडे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. तेव्हा प्रशासनाकडून विशेष उपाय योजनांना सुरुवात करण्यात आली. दरम्यान देशभरात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला. तेव्हा अनेक नागरिकांकडे पैसे होते म्हणून त्यांनी गरजेचे साहित्य भरून ठेवले. मात्र आठवड्याभरानंतर लोकांचे जगणे मुश्किल झाल्याचे, ड्युटीवर असताना पाहण्यास मिळाले. त्याच दरम्यान आपल्याकडे गहू, ज्वारी धान्याची दळणची मशीन आहे. आपण ज्यांच्याकडे पीठ दळलेले नसेल अशांना एक पैसा न घेता दळून द्यायच असं ठरवले. सुरुवात आपल्या स्टेशनच्या कर्मचार्‍यांपासून करावी असं मनोमन ठरवून त्यानुसार धान्य दळून देण्यास सुरुवात झाली. मी एकदा ड्युटीवर असताना, अनेक लोक रस्त्यावर फिरताना पाहिले त्यांच्याकडे विचारपूस केली. तेव्हा त्यांनी  भूक लागली असल्याचे कळवळून सांगितले. मी त्याना जेवणाचे पॅकेट आणून दिले. त्यानंतर आपण देखील अशा गरजू नागरिकांना मदत करायला हवी असा विचार मनात आला.  तेव्हापासून काही संस्था, संघटनांच्या मदतीने झोपडपट्टी भागात दररोज 200 नागरिकांना जेवणाचे पॅकेट देण्याच काम करीत आहे. या कामात पोलीस विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, आपल्याला करोनाला हरवायच असेल, तर प्रत्येकाने घरी बसावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

   त्यामुळे दोन्ही मुलांना गावी सोडले –

माझे पत्नी सैन्य दलात आहेत आणि मी पोलीस विभागात 12 वर्षांपासून काम करत आहे. मला स्वरुप हा दहा वर्षाचा मुलगा आणि दोन वर्षांची स्वरा ही मुलगी आहे. मी कामामुळे किमान दररोज 12 तास बाहेर आणि घरात मुलं असायची. कामावरून आल्यावर मुले पळत जवळ यायची. ते दोघे लहान असल्याने त्यांना या आजाराबद्दल एवढी माहिती नाही. दोघांना माझ्यामुळे त्रास होता कामा नये म्हणून मुलांना गावी पाठवले असल्याचे हर्षला खाडे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या डोळे भरून आले होते.