scorecardresearch

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनासाठी सिंबायोसिसला दरवर्षी ७५ लाख रुपयांचे अनुदान, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्र्यांची घोषणा

पुण्यातील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या प्रस्तावित अध्यासनाला ७५ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी

Symbiosis college pune program

देशातील विद्यापीठांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात अभ्यास आणि संशोधनासाठी सुरू करण्यात येणाऱ्या अध्यासनाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे दरवर्षी ७५ लाख रुपये अशा स्वरूपाचे अनुदान देण्यात येते. पुण्यातील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या प्रस्तावित अध्यासनालाही हे अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी शुक्रवारी (६ मे) केली.

सिंबायोसिस शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या रौप्य महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर होलोग्रामचे उद्घाटन डॉ. वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, स्मारकाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार, संस्थेच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यावेळी उपस्थित होत्या.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कालातीत”

डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले, “समाजातील तळागाळातील व्यक्तीची सामाजिक आणि आर्थिक प्रगती झाली तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कालातीत होते. देशात आतापर्यंत केवळ ‘गरिबी हटाओ’च्या घोषणा दिल्या जात होत्या. परंतु, सगळ्यांना घेऊन विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाऊल उचलले आणि खऱ्या अर्थाने ‘सबका साथ, सबका विकास’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम सुरू ठेवले.”

“सामाजिक न्याय मंत्रालयासाठी यंदा एक लाख ४२ हजार ३४२ कोटी रुपयांची तरतूद”

“केंद्र सरकारने सामाजिक न्याय मंत्रालयासाठी यंदा एक लाख ४२ हजार ३४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अन्य मंत्रालयांच्या तुलनेत अर्थसंकल्पात दिलेली ही तरतूद चांगली आहे,” असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

रामदास आठवले यांची शीघ्रकविता

पुरी दुनिया में हैं बाबासाहेब का नाम, हम पुरा करेंगे उनका अधुरा काम
शिक्षणाच्या कामात ज्यांनी कधीच मानली नाही हार, त्यांचे नाव आहे डॉ. मुजुमदार
ज्यांचे आहे खुले द्वार, तुम्ही सिंबायोसिसला याल बार बार

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Social justice minister announce 75 lakh grant to symbiosis in pune print news pbs