scorecardresearch

नामवंतांचे बुकशेल्फ : किमान मुलांसाठी तरी आपण वाचले पाहिजे

मराठी आणि इंग्लिश भाषेतील चरित्र, आत्मचरित्र वाचन करण्यामध्ये मला आनंद वाटतो.

renuka gavaskar
रेणू गावस्कर (सामाजिक कार्यकर्त्यां)

रेणू गावस्कर (सामाजिक कार्यकर्त्यां)

मराठी आणि इंग्लिश भाषेतील चरित्र, आत्मचरित्र वाचन करण्यामध्ये मला आनंद वाटतो. वाचन करणाऱ्या व्यक्तीमध्ये नम्रपणा आढळून येतो. मुलांना वाचनासाठी प्रवृत्त करताना आधी आपण वाचले पाहिजे. त्यामुळे लहान मुलांवर वाचन संस्कार करीत त्यांना देखील चांगले व्यक्ती म्हणून घडविण्याकरिता आपण प्रत्येकाने आधी वाचलेची पाहिजे.

‘सुरंगिनीज् टेल्स’ हे प्रताप शर्मा यांचे पुस्तक ३२ वर्षांपूर्वी माझ्या हातात पडले. त्यातील चित्रे आणि गोष्टी इतक्या अफलातून होत्या की माझी मुले देखील त्यामध्ये हरखून जायची. त्यामुळे माझी इंग्लिश वाचनाची गोडी आणि कथावाचनाची सुरुवात याच पुस्तकापासून झाली. आपल्या घरातील मुले असो किंवा समाजातील वंचित-विशेष मुले, त्यांना समृद्ध करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. लहान मुलं कधीच आपणहून वाचत नाहीत. त्यामुळे आपण आपल्या हाताने पुस्तकांचे हे जग त्यांना उलगडून दाखवायला हवे. त्याकरिता आपण असंख्य पुस्तकांचे वाचन करायला हवे. समाजात काम करताना माणसांप्रमाणेच पुस्तकांकडून देखील मी खूप काही शिकले. कधीही कोणाची कीव करू नये, हा जीवनातील महत्त्वाचा वस्तुपाठ मला पुस्तकांनीच शिकविला. त्यामुळे पुस्तक आणि वाचनासारख्या सुंदर दोस्ताशी आपण घट्ट मत्री करायला हवी.

लहानपणी घरामध्ये वाचनासाठी तसे पोषक वातावरण नव्हते. लग्नानंतर खऱ्या अर्थाने माझ्या वाचनप्रवासाला सुरुवात झाली. माझ्या सासरी पतीकडून मला पुस्तकांची भेट मिळत असे. विश्राम बेडेकर यांचे ‘रणांगण’ आणि टॉलस्टॉयच्या चरित्रात्मक पुस्तकांचे वाचन त्या निमित्ताने सुरू झाले. एम.ए.चे शिक्षण होईपर्यंत क्रमिक पुस्तकांचे वाचन सुरू होते. दरम्यान, व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करताना डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ‘मुक्तिपत्रे’ हे पुस्तक मला भावले. एखाद्या व्यक्तीला व्यसन कोणत्या थरापर्यंत पोहोचवू शकते, याची मांडणी पुस्तकामध्ये प्रभावीप्रमाणे करण्यात आली होती. त्यामुळे त्या विषयाशी निगडित पुस्तकांशी माझी जवळीक वाढू लागली. याशिवाय डॉ. आनंद यादव यांचे ‘झोंबी’, जीना यांच्या पत्नीवरील चरित्रात्मक पुस्तक अशा निरनिराळ्या विषयांच्या पुस्तकांमध्ये मी रमू लागले.

मुंबईच्या फोर्ट भागात पेटीट लायब्ररीमध्ये मी कमालीचे वाचन केले. वेद मेहता यांच्या ‘द लेज् बीटवीन द टू स्ट्रीम्स’ या पुस्तकाची अक्षरश: पारायणे केली. इंग्लिश पुस्तकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या वाचनामध्ये आपल्या बुद्धिमत्तेला विचार करायला लावणाऱ्या चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या विषयांवरील पुस्तकांचे वाचन देखील करीत होते. वयाच्या विसाव्या वर्षी एखाद्या पुस्तकाचे केलेले वाचन आणि पन्नासाव्या वर्षी त्याच पुस्तकाच्या केलेल्या वाचनातून त्या विषयाकडे पाहण्याची दृष्टी बदलते, हा

अनुभव मी घेतला. पेटीट लायब्ररीप्रमाणेच ब्रिटिश कौन्सिल आणि एशियाटिक लायब्ररी या वाचनालयांशी संबंधित होते. ब्रिटिश कौन्सिलमध्ये अभिनेत्री नूतन आणि एशियाटिक लायब्ररीमध्ये दुर्गाबाई भागवत यांना भेटण्याची संधी देखील मला पुस्तकांमुळेच मिळाली.

मराठी आणि इंग्लिश पुस्तकांमध्ये चरित्र आणि आत्मचरित्रांचे वाचन मोठय़ा प्रमाणात झाले. त्यामध्ये डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र मला जास्त भावले. त्यांनी या चरित्रामध्ये त्यांच्या जहाजावरच्या प्रवासाचे वर्णन केले होते. ग्रंथवाचनाच्या गोडीने त्यांना त्यांच्या नमित्तिक गरजा देखील जाणवल्या नाहीत आणि वाचनामुळे जीवनात त्या आनंद मिळवू शकल्या, हे वाचून मी भारावून गेले. रखमाबाई, अरुणा ढेरे, प्रेमचंद यांचे साहित्य मला फार आवडते. कथेमागची कथा आणि त्या लेखकाचे वेगळेपण शोधण्याचा मी नेहमी प्रयत्न करते. विशेषत: पाश्चात्त्य कथाकारांबाबत मी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रेड शूज, मॅचगर्ल सारख्या हृदयस्पर्शी कथांमधून मिळालेले धडे आजही माझ्या दैनंदिन जीवनात मी इतरांना सांगते.

अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांची मी अनेक पुस्तके वाचली. आजही ती पुस्तके माझ्या संग्रही आहेत. आईकडून मिळालेल्या संस्कारांमुळे मी सामाजिक क्षेत्राकडे वळणार हे साहजिकच होते. त्यामुळे स्त्रियांच्या वेदना आणि वंचित-विशेष मुलांचे दु:ख कमी करून त्यांना चांगले भविष्य देण्याच्या प्रयत्नात मंडई परिसरात २००३ मध्ये एकलव्य फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली. जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस सुखी नाही, तोपर्यंत समाज सुखी होत नाही, हा विचार माझ्या मनात कायम होता. त्यामुळे संस्थेतील चिमुकल्यांना गोष्टी सांगत त्यांचे हात बळकट करण्याकरिता प्रेरणा देण्याचा मी प्रयत्न केला. या कामाची प्रेरणा देखील मला साहित्यातूनच मिळाली.   छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराजा सयाजीराजे गायकवाड यांचे मराठीतील चरित्र मला प्रेरणा देणारे होते. त्यामुळे पाचगणीसह अनेक ठिकाणी शाळा आणि संस्थांतील मुलांना मी गोष्टी सांगायला जाते. आपण वाचले तरच आपण मुलांना गोष्टी सांगू शकू, असे मला वाटते. त्यामुळे डेक्कन जिमखान्याजवळील इंटरनॅशनल बुक सव्‍‌र्हिस, अक्षरधारा बुक गॅलरी, ना. सी. फडके चौकानजीक पूर्वी कार्यरत असलेले पाथफाइंडर या दुकानांमधून मी आवर्जून पुस्तकांची खरेदी करीत असे. ‘साधना’मधील साहित्य माझ्या फार जवळचे आहे. त्यामुळे तेथील पुस्तकांमध्ये मी रमले, तरी अनेकदा मला वेळेचे भान राहत नसे. सत्यजित रे, ज्ञानेश्वर मुळे, लक्ष्मीकांत देशमुख यांचे साहित्य मी वाचते. आपल्या वाचनाला कोणत्याही सीमा किंवा बंधने नसावीत, असे मला नेहमी वाटते. समाजात आपले स्थान काय, आपण कोणत्या ठिकाणी आहोत, याची जाणीव आपल्याला वाचनातून होते. त्यामुळे मनापासून वाचन करणारी प्रत्येक व्यक्ती हा आपले स्थान ओळखून असतो. त्या वाचनप्रेमींमध्ये आपल्याला एक वेगळाच नम्रपणा आढळतो. त्यामुळे लहान मुलांवर वाचन संस्कार करीत त्यांना देखील चांगले व्यक्ती म्हणून घडविण्याकरिता आपण प्रत्येकाने आधी वाचलेची पाहिजे.. हा मंत्र लक्षात ठेवायला हवा.

शब्दांकन : वीरेंद्र विसाळ

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-04-2017 at 01:50 IST
ताज्या बातम्या