पुणे : जागतिक हृदय दिनाच्या (२९ सप्टेंबर) दिवशी सोलापूरच्या नऊ वर्षांच्या मुलाच्या अवयवदानातून चेन्नईतील तीन वर्षांच्या रशियन चिमुकल्याला नवजीवन मिळाले. सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील या मुलाच्या कुटुंबाने अत्यंत दुःखद प्रसंगी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने चार रुग्णांना जीवनाची नवी आशा मिळाली आहे.
घरासमोरील रस्ता ओलांडताना झालेल्या अपघातात नऊ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने सोलापुरातील ‘चंदन न्यूरोसायन्सेस हॉस्पिटल’मध्ये दाखल करण्यात आले. हॉस्पिटलचे डॉ. प्रसन्न कासेगावकर यांच्या निगराणीखाली त्याच्यावर उपचार सुरू होते. वैद्यकीय पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारांदरम्यान त्याला मेंदूमृत घोषित करण्यात आले.
या परिस्थितीत मुलाच्या आई-वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे दान करण्यात आली. हृदय चेन्नईतील एका तीन वर्षीय बालरुग्णाला, यकृत पुण्यातील एका रुग्णाला, तर दोन्ही मूत्रपिंडे पुण्यातील दोन रुग्णांना देण्यात आली.
विशेष म्हणजे, या मुलाचे हृदय त्याच रक्तगटाचा योग्य प्राप्तकर्ता सोलापुरात उपलब्ध नसल्याने वाया जाण्याची शक्यता होती. त्यामुळे अवयव प्रत्यारोपण पुणे विभागाच्या समन्वयक आरती गोखले यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर हृदय उपलब्ध असल्याची सूचना जारी केली. त्यानंतर चेन्नईतील ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या तीन वर्षीय रशियन बालकासाठी हे हृदय उपलब्ध झाले.
‘हृदय प्रत्यारोपणासाठी वेळ अत्यंत महत्त्वाचा असल्याने चेन्नईची वैद्यकीय टीम चार्टर विमानाने सोलापूरला पोहोचली. हृदयाचे प्रत्यारोपणासाठीचे आयुष्य साधारण चार ते सहा तासांचे असल्याने सोलापूर ते चेन्नईदरम्यान ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली. प्रतिकूल हवामानामुळे विमान उड्डाण केल्यानंतर पुन्हा धावपट्टीवर परतावे लागले. त्यामुळे काही मौल्यवान वेळ गेला. मात्र, वैद्यकीय पथकाने आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करून हृदय चेन्नईला पोहोचवले,’ अशी माहिती ‘चंदन न्यूरोसायन्सेस’च्या अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. पल्लवी मेहता यांनी दिली.
या प्रक्रियेत डॉ. वीरेश नाष्टे, डॉ. संतोष गुजरे, डॉ. शारद जाधव, प्रत्यारोपण समन्वयक डॉ. संदीप पाटील आणि हॉस्पिटलच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
विभागीय प्रत्यारोपण समन्वय पुण्याच्या समन्वयक आरती गोखले यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सोलापूरच्या नऊ वर्षे मुलगा अवयव दान करणार असल्याचा ‘अलर्ट’ हा ‘नाटो’ अर्थात ‘नॅशनल ऑर्गन अँड टिशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ने दिला. त्यानुसार चेन्नईमधील एका तीन वर्षीय रशियन मुलाला हृदयाची गरज असल्याचे पुढे आले आणि त्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया पार पडली.
चंदन न्यूरोसायन्सेस हॉस्पिटल’मधील अतिदक्षता विभाग प्रमुख डॉक्टर पल्लवी मेहता म्हणाल्या की, अवयवदानाच्या सर्व प्रक्रियेमध्ये मुलाच्या आई-वडिलांनी धीरोदत्तपणा दाखवला. हृदय देताना अवघ्या सहा तासांत चेन्नईला ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे पाठवले. मात्र, अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खरे तर जागतिक हृदय दिनाच्या दिवशी एका तीन वर्षांच्या मुलाला हृदय दिले गेले, ही खरोखर अप्रूप घटना आहे.
