पुणे : उजनी धरणातून हमखास पाणी मिळण्याची खात्री असल्यामुळे लाभक्षेत्रातील करमाळा, माळशिरस, माढा आणि पंढरपूर तालुक्यांत केळींची लागवड वाढली आहे. निर्यातीत सोलापूरने जळगावला मागे टाकले आहे. यंदा एप्रिल ते जून दरम्यान राज्यातून झालेल्या एकूण केळी निर्यातीत सोलापूरचा वाटा ७५ टक्के इतका आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात प्रामुख्याने जळगाव, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत केळी लागवड होते. जळगावच्या केळींचा देशभरात दबदबा असला तरी, पाच-सहा वर्षांपासून सोलापूर जिल्ह्याने केळीच्या निर्यातीत आघाडी घेतली आहे. यंदा (एप्रिल ते जून २०२२) राज्यातून ६२,२०७ टन केळींची निर्यात झाली आहे, तर एकटय़ा सोलापूर जिल्ह्यातून ४७,२०० टन निर्यात झाली आहे. राज्यातून झालेल्या एकूण केळींच्या निर्यातीत ७५.८८ टक्के  वाटा एकटय़ा सोलापूर जिल्ह्याचा आहे.  राज्याच्या एकूण निर्यातीत सोलापूर जिल्ह्याचा वाटा २०१७ मध्ये ५३.२० टक्के,  २०१८ मध्ये ६७.७३ टक्के, २०१९ मध्ये ६५.१५ टक्के, २०२० मध्ये ५५.३४ टक्के, २०२१ मध्ये ६९.१४ टक्के आणि २०२२मध्ये जूनअखेर ७५.८८ टक्के वाटा राहिला आहे.

सोलापूरमधील लागवड

उजनी धरणातून पाणी मिळण्याची हमखास खात्री असल्यामुळे करमाळा, माढा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यांत केळी खालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यात केळी पिकाखालील एकूण क्षेत्र ७७१६ हेक्टर इतके आहे. त्यापैकी करमाळय़ात ३१७४ हेक्टर, माढय़ात १३९० हेक्टर, माळशिरसमध्ये २११७ हेक्टर आणि पंढरपूरमध्ये ५७९ हेक्टर इतके क्षेत्र आहे. जिल्ह्याचे एकूण केळी उत्पादन ६१ लाख ७ हजार ५२० टन इतके उत्पादन असून, प्रति हेक्टरी उत्पादकता ८० टन इतकी आहे.

दहा ठिकाणी निर्यात सुविधा

करमाळा, माढा, माळशिरस आणि पंढरपूर या चार तालुक्यांत दहा ठिकाणी केळीच्या निर्यातीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात आली आहे. शीतगृह, दर्जेदार वेष्टन व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापुरातून इराण, ओमान, दुबई, इराक, सौदी अरेबिया, नेपाळ येथे केळींची निर्यात करण्यात येते. निर्यातक्षम उत्पादन आणि निर्यातीसाठीच्या सोयी-सुविधांबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले जाते.

निर्यातक्षम केळींच्या उत्पादनासाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. दर्जेदार उत्पादन आणि निर्यातीसाठीच्या सुविधांमुळे सोलापूरने निर्यातीत राज्यात आघाडी घेतली आहे. सध्या निर्यातक्षम केळींना प्रति क्विंटल २७०० रुपयांचा भाव मिळत आहे. प्रति हेक्टरी उसापेक्षा जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे केळी लागवड वाढली आहे. शेतकरी ज्वारीऐवजी केळी पिकाला प्राधान्य देत आहेत. जिल्हयात सुमारे बावीस हजारे शेतकरी केळीची लागवड करतात.

बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solapur emerges as top exporter of bananas zws
First published on: 27-09-2022 at 03:18 IST