scorecardresearch

विद्राव्य खतांचा राज्यात ठणठणाट ; फळपिके, भाजीपाला उत्पादनावर मोठा परिणाम 

राज्यात विद्राव्य खतांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. विद्राव्य खतांच्या पुरवठादारांनी आमच्याकडे खतांचा साठा नाही, आयात केलेली खते कधी येणार, याची शाश्वती नाही, असे सांगितल्यामुळे विद्राव्य खतांचा वापर करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत.

(संग्रहीत छायाचित्र)

दत्ता जाधव

पुणे : राज्यात विद्राव्य खतांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. विद्राव्य खतांच्या पुरवठादारांनी आमच्याकडे खतांचा साठा नाही, आयात केलेली खते कधी येणार, याची शाश्वती नाही, असे सांगितल्यामुळे विद्राव्य खतांचा वापर करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. शिवाय विद्राव्य खतांच्या किमती सुमारे ७० टक्क्यांनी वाढल्यामुळे आयात केलेल्या खतांचा वापर करणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. याचा परिणाम म्हणून शेतीमालाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. राज्यात एका वर्षांला सुमारे साडेचार लाख टन विद्राव्य खतांचा उपयोग केला जातो.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाची खरड छाटणीसाठी लागणाऱ्या विद्राव्य खतांच्या नियोजनासाठी बैठक झाली. या बैठकीत विद्राव्य खतांच्या चार पुरवठादारांकडे खतांची मागणी केली असता, आमच्याकडे खतांचा साठा नाही. खतांच्या आयातीचे करार केले आहेत. पण, खते कधी येतील याची कोणतीही शाश्वती नाही, अशी माहिती पुरवठादारांनी दिली. इफ्कोसारख्या मोठय़ा कंपनीकडूनही असेच उत्तर मिळाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष  शिवाजी पवार यांनी दिली.

विद्राव्य खते चीन, इस्रायल, युक्रेन, रशिया, बेल्जियम आदी देशांतून आयात केली जातात. चीनकडून सर्वाधिक खतांची आयात होते, शिवाय इतरांच्या तुलनेत ती स्वस्तही मिळतात. मात्र, मागील काही दिवसांपासून चीनने देशांतर्गत तुटवडा आणि दरवाढ रोखण्यासाठी सर्वच प्रकारच्या खतांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आता एप्रिल आणि मे महिन्यांत चीनने आपला निर्यातीचा कोटा खुला केला आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी ज्या कंपन्यांनी खतांसाठी करार केले होते, त्यांची खते आता येऊ लागली आहेत. आता नव्याने करार केल्यास खते देशात येण्यास जून महिन्याची वाट पहावी लागणार आहे. इस्रायलकडून खतांचा अपेक्षित पुरवठा होत नाही आणि ती खते महाग असल्यामुळे परवडतही नाहीत.

खतांची दरवाढ आवाक्याबाहेर

द्राक्ष बागायतदार संघाचे व्यवस्थापक सुरेश शेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजारात विद्राव्य खते उपलब्ध नाहीत, शिवाय आता ज्या खतांची आयात केली आहे, त्यांच्या दरात सुमारे ७० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ०:१२:६१ या खताची २५ किलोची पिशवी २५०० रुपयांनी मिळत होती, आता तिचे दर ५००० हजारांवर जाण्याची शक्यता आहे. अन्य खतांची दरवाढ अशीच आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शेतकरी खते कमी वापरतील. पण, त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम होणार आहे. केवळ द्राक्ष संघालाच वर्षांला सुमारे ८००० हजार टन विद्राव्य खते लागतात.

विद्राव्य खते म्हणजे काय?

विद्राव्य खते म्हणजे पाण्यात सहजपणे शंभर टक्के विरघळणारी खते (वॉटर सोल्युबल फर्टिलायझर). राज्यात ठिबक सिंचनावर उत्पादित होणाऱ्या फळपिके, भाजीपाला पिके, हरितगृहातील शेतीसाठी मोठय़ा प्रमाणावर विद्राव्य खतांची गरज असते. ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतेच देणे सोयीचे असते. या खतांची शंभर टक्के आयात करावी लागते.

कृषी विभागाचे विद्राव्य खतांच्या आयातीवर नियंत्रण नसते. विद्राव्य खतांना कोणतेही अनुदान नसते. परिणामी कंपन्या इतर देशांशी करार करून खते मागवितात. आलेल्या खतांचा दर्जा तपासून विक्रीसाठी परवाने देणे इतकेच आमचे काम असते. विद्राव्य खतांची आयात, वितरण आणि दरांवर कृषी विभागाचे नियंत्रण असत नाही. सध्या जागतिक परिस्थितीचा परिणाम म्हणून विद्राव्य खतांची टंचाई आहे.

-दिलीप झेंडे, संचालक, गुण नियंत्रण व निविष्ठा (कृषी विभाग)

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Solubility soluble fertilizers state big impact fruit vegetable production ysh

ताज्या बातम्या