बारामती : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. बंडखोरी केलेले कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचा पराभव झाला.
आतापर्यंत निकाल जाहीर करण्यात आलेल्यांमध्ये निंबुत खंडाळा गटातील अभिजीत सतीश काकडे, प्रमोद भगवानराव काकडे, वसंतराव रामराव दगडे हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. या गटातील ब वर्गातून संग्राम सोरटे विजयी झाले आहेत. मतमोजणीमध्ये अन्य बहुतांश गटांमध्ये ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार हे आघाडीवर आहेत.
पुरुषोत्तम जगताप यांचा ६४९० मतांनी पराभव
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांनी वाणेवाडी येथून निवडणूक लढविली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून विक्रम भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून राजेंद्रकुमार जगताप हे उमेदवार होते. विक्रम भोसले यांनी पुरुषोत्तम जगताप यांचा ६४९० मतांनी पराभव झाला. भोसले यांना १३ हजार ८५४ मते मिळाली, तर पुरुषोत्तम जगताप यांना ७३६४ मते मिळू शकली.
दरम्यान, या कारखान्याच्या निवडणुकीसाठी ८४.२५ टक्के मतदान झाले आहे. कारखान्याच्या २१ जागांसाठी तीन पॅनेलचे ६२ उमेदवार आणि २१ अपक्ष, असे एकूण ८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर उभ्या राहिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ होते. त्याचे नेतृत्त्व युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’चा प्रचार आणि नियोजनाची धुरा युवा नेते जय पवार यांनी सांभाळली. भाजपने ‘राष्ट्रवादी’त फूट पाडून कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बंडखोर गटाचा पाठिंबा घेत ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरविले.
मात्र, बंडखोरांचा निभाव लागला नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. बारामती आणि पुरंदर तालुक्यांसह सातारा जिल्ह्यातील खंडाळा आणि फलटण तालुक्यांपर्यंत या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. सर्व तालुक्यांतून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला प्रतिसाद मिळाला आहे.
