बारामती : बरामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, पहिला निकाल जाहीर झाला आहे. ब वर्ग गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे संग्राम सोरटे विजयी झाले आहेत. मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

या कारखान्याच्या निवडणुकीसाठी ८४.२५ टक्के मतदान झाले आहे. कारखान्याच्या २१ जागांसाठी तीन पॅनेलचे ६२ उमेदवार आणि २१ अपक्ष, असे एकूण ८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिला निकाल जाहीर झाला आहे. ब गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) संग्राम सोरटे हे विजयी झाले आहेत. त्यांना १३१ पैकी ९२ मते मिळाली.

या कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर उभ्या राहिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ आहे. त्याचे नेतृत्त्व युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ असून, प्रचार आणि नियोजनाची धुरा युवा नेते जय पवार यांनी सांभाळली. भाजपने ‘राष्ट्रवादी’त फूट पाडून कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बंडखोर गटाचा पाठिंबा घेत ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत झाली.

बारामती आणि पुरंदर तालुक्यांसह सातारा जिल्ह्यातील खंडाळा आणि फलटण तालुक्यांपर्यंत या कारखान्याचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे. पहिल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विजय मिळविला आहे. अन्य गटामध्येही राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने आघाडी घेतली आहे.

बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांच्या वाणेवाडी गटाकडे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांनी वाणेवाडी येथून निवडणूक लढविली. त्यामुळे या गटाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून विक्रम भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून राजेंद्रकुमार जगताप हे उमेदवार आहेत.