पुणे : अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व किती खंबीर आहे, हे सोमेश्वर सहकारी कारखान्याच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. कारखाना निवडणुकीत मतदारांनी अजित पवार यांच्या कुटुंबाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्याविषयी मतदारांच्या मनात असलेले प्रेम या निकालातून अधोरेखित झाले असून, ते हयात नसताना कुटुंबाशी प्रतारणा करणाऱ्यांना मतदारांनी जागा दाखवली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ला यश मिळाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, स्वीकृत नगरसेवक राकेश कामठे यावेळी उपस्थित होते.काही नेते आणि पदाधिकारी सोबत नसले, तरी सर्वसामान्य मतदार अजित पवार यांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. कारखान्याच्या यशाचे श्रेय केवळ अध्यक्षांच्या कारभाराला देता येणार नाही. त्यामागे अजित पवार यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते. कारखान्याची पुढील वाटचाल पवार कुटुंबाच्या नेतृत्वाखाली व्हावी, याला मतदारांनी कौल दिला आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
सोमेश्वर कारखान्याचे १३ वर्षे अध्यक्ष राहिलेल्या पुरुषोत्तम जगताप यांचे बंड अचानक झाले नसून त्याची तयारी आधीपासूनच सुरू होती, असा आरोपही त्यांनी केला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी सहा तास प्रतीक्षा केली होती. मात्र, पुरुषोत्तम जगताप यांनी ऐनवेळी भूमिका बदलली. ही बाब मतदारांना आवडली नसल्याचे निकालातून दिसून आल्याचेही पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले, पुरंदर तालुक्याच्या प्रतिनिधित्वाबाबत संजय जगताप यांच्याशी निवडणुकीच्या आधी एक दिवसापर्यंत चर्चा सुरू होती. दोन जागांवरील उमेदवार पवार कुटुंबानेच ठरवावेत, अशी भूमिका संजय जगताप यांनी मांडली होती. मात्र, नंतर त्यांनी शब्द फिरवला. बंडखोरांना भाजपचा नेमका किती पाठिंबा होता, हे निश्चितपणे सांगता नाही. मात्र, भाजपच्या जिल्ह्यातील जबाबदार नेत्यांनी बारामती, पुरंदर आणि सातारा परिसरातील कार्यकर्त्यांना पवार कुटुंबाच्या नेतृत्वाखालील पॅनेलला मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असा दावाही त्यांनी केला.
