बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या कारखान्यातील शेतकरी, सभासद आणि कष्टकऱ्यांच्या नखालाही धक्का लावण्याचा कोणी प्रयत्न केला, तर मागे-पुढे पाहणार नाही. मी संयमी आहे, याचा अर्थ माझी कमजोरी समजू नका. तुम्ही आतापर्यंत मायाळू वहिनी पाहिली, आता दुर्गाही पाहाल,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी सांगता सभेत विरोधकांना लक्ष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार पॅनेल’च्या प्रचाराच्या सांगता सभेत त्या बोलत होत्या. या वेळी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री आमदार विजय शिवतारे, जय पवार, वीरधवल जगदाळे आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या, ‘अजित पवार यांच्या निधनानंतर सोमेश्वर कारखान्याची निवडणूक अशा प्रकारे लढवावी लागेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. कारखान्याला उच्चांकी भाव दिल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी अपेक्षा होती. अजितदादांनी कारखान्याचे राखणदार म्हणून काम केले.
माझी भूमिका सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची होती. मात्र, काहींना ती मान्य नव्हती. सहकारात एकी हीच शक्ती असते. संस्थेचे हित माझ्यासाठी सर्वोच्च आहे. सर्वसमावेशक पॅनेल तयार केला होता, मात्र, ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांनीच अंधारात ठेवून संधी साधली. काही गोष्टींबाबत आम्हाला बेसावध ठेवण्यात आले. ही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा कारखान्याच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे हा लढा भस्मासुराच्या विरोधात आहे.’
‘अजितदादा गेल्याचे आम्ही कधीही राजकीय भांडवल केले नाही. मात्र, विरोधी पॅनेलकडून त्यांच्या छायाचित्रांचा आणि आवाजाचा वापर केला जात आहे. त्यांच्या नावाने मतांचा जोगवा का मागता? सभासदांची दिशाभूल का करता?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ‘शेतकऱ्यांचे भले हा मुख्य विषय बाजूला पडला असून, निवडणुकीत मार्केटिंगला महत्त्व दिले जात आहे. विरोधकांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चालणारी, ताटाखालची माणसे हवी होती. ‘हम करे सो कायदा’ अशी भूमिका राबविण्याचा त्यांचा अट्टहास होता.’ असा आरोप त्यांनी केला.
