बारामती: ‘श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत किटली चिन्हावरील पॅनेलला जास्तीत जास्त जागा मिळतील. उद्याचा चेअरमन कोण होणार, हे किटलीच ठरवेल,’ असा ठाम दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी रविवारी (११ ऑक्टोबर) केला. तिरंगी लढतीत कोणाला किती जागा मिळतील, हे आताच सांगणे शक्य नसले, तरी मतदार शरद पवार यांचे मार्गदर्शन, उमेदवारांची गुणवत्ता आणि काम करण्याची तळमळ पाहून कौल देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी निवडणुकीतील पॅनेलची स्थिती, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत झालेली चर्चा आणि विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांवर भूमिका स्पष्ट केली.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत जय पवार यांच्याशी चर्चा झाल्याच्या मुद्द्यावर युगेंद्र पवार म्हणाले, रेवतीचे लग्न झाल्यानंतर ती घरी आली होती. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र जेवायला भेटलो होतो. त्या वेळी सुप्रिया सुळे, पार्थ पवार, जय पवार आणि मी उपस्थित होतो. बोलता बोलता सोमेश्वरच्या निवडणुकीत आपण एकत्र आलो, तर काय हरकत आहे, असा सहज प्रश्न मी विचारला. त्यावर कार्यकर्त्यांची इच्छा नाही, त्यामुळे ते शक्य नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, आपण त्या भागातील नेते आहात. कारखान्याचा आणि सभासदांच्या हिताचा विचार केला पाहिजे. सभासदांच्या हितासाठी एकत्र येण्यात अडचण नसावी, अशी भूमिका मी मांडली. या विषयावर केवळ दोन मिनिटे चर्चा झाली. इतर वेळी रेवतीशी संबंधित गप्पा सुरू होत्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

ही चर्चा केवळ सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत एकत्र येण्यापुरतीच होती, असेही त्यांनी सांगितले. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नाही. त्यामुळे सहकार क्षेत्रात राजकारण आणण्यापेक्षा शेतकऱ्याच्या प्रपंचासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले पाहिजे, हा शरद पवार साहेबांचा विचार आहे. तोच आम्ही मांडला, असे ते म्हणाले.पुरुषोत्तम जगतापांना सवालसोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगता सभेत आपल्या मागे शरद पवार असल्याचा दावा केल्याबाबत विचारले असता, युगेंद्र पवार यांनी त्यांना अप्रत्यक्षपणे सवाल केला.

बोलायला काय जाते? कोणीही काहीही बोलेल. लोक सुज्ञ आहेत. साहेब कोणाच्या मागे आहेत, हे लोकांना माहीत आहे. प्रत्येकजण आम्ही साहेबांना मानणारे आहोत, असे सांगतो. मात्र, साहेबांना एवढेच मानत असाल, तर त्यांच्या पॅनेलमधून का उभे राहिला नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.सोमेश्वरसाठी आम्ही आधीपासूनच तयारी केली होती. आमचे पॅनेल तेव्हा पण उजवे होते आणि आजही आहे. आम्ही सर्व सुशिक्षित उमेदवार दिले आहेत, मतदार शरद पवार यांच्याकडे, उमेदवारांकडे आणि त्यांच्या काम करण्याच्या तळमळीकडे पाहून मतदान करतील. – युगेद्र पवार, युवा नेते