बारामती : ‘बारामतीतील अनेक संस्थामध्ये आम्ही एकत्र आहोत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही पक्षाची नाही. ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होत नसल्याने वाद दिसायला नको म्हणून ‘आपण एकत्र यायला हवं’ असे बैठकीत बोललो होतो,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी जाहीरपणे सांगितले.

पवार कुटुंबीयांची मुंबईत बैठक झाली होते. या बैठकीविषयी युगेंद्र पवार म्हणाले, ‘आम्ही त्या ठिकाणी जेवणासाठी एकत्र आलो होतो. त्या ठिकाणी खासदार पार्थ पवार आणि जय पवार होते. सोमेश्वर कारखान्यामध्ये आपण एकत्र यायला काय हरकत आहे, असा मी सहज प्रश्न केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आठ महिने झाले आहेत. त्यामुळे आपण ही निवडणूक एकत्र लढू, असे मी त्यांना म्हणालो. सहकारामध्ये राजकारण नको, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे म्हणणे आहे, असेही निदर्शनास आणून दिले.’

माळेगाव सहकारी साखर कारखाना ७० कोटी रुपयांच्या तोट्यात गेल्याचा दावा युगेंद्र पवार यांनी केला आहे. त्यावर जय पवार यांनी ‘हा आरोप चुकीचा असून खोट्या अफवा पसरवू नका. हा कारखाना दोन कोटी रुपये नफ्यामध्ये आहे’, असे प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत युगेंद्र पवार म्हणाले,‘जय पवार यांनी मुद्दाम माझ्यावर टीका केलेली नाही. सभेमध्ये बोलता बोलता ते बोलून गेले असतील. परंतु एवढा मोठा आरोप करत असताना माझ्याकडे देखील काहीतरी पुरावा असेल. माळेगाव कारखाना अडचणीत आहे. डिस्टिलरीला कुलूप आहे. पण मी जे बोललो ते त्यांना एवढे लागेल असे मला वाटले नव्हते. माळेगाव कारखाना हा तोट्यातच आहे, हे सत्य आहे.’

‘माळेगाव कारखान्यासंबंधी मी जे बोललो ते कुणाला लक्ष करण्यासाठी बोललो नाही. ते योगायोगाने मी बोललो आहे. मी वैयक्तिक कोणावरही टीका केलेली नाही. कारखान्याची परिस्थिती मी त्या ठिकाणी मांडली आहे.’ असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.