बारामती : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी थंडावल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडी घडल्या असून, बंडखोरी केलेले कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलमधील सर्व उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातून निलंबित करण्यात आले.

तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत संभ्रम निर्माण झाला असताना पुरंदर तालुक्यातील काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पॅनेलला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. या कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करणारे जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांवर ‘राष्ट्रवादी’ने कारवाई केली आहे.

पक्षाची भूमिका डावलून निवडणुकीत स्वतंत्र वाटचाल केल्याने सर्वांना पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे पक्षाकडून जाहीर करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला पुरंदर तालुक्याचा पाठिंबा असल्याचा दावा दत्ता झुरंगे यांनी केला होता. त्यावरून संभ्रम निर्माण झाला होता. ‘झुरंगे यांच्याकडे कोणतेही पद नाही. त्यांचा तो वैयक्तिक पाठिंबा असेल.

काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही,’ असे तालुकाध्यक्ष संभाजी जगताप यांनी सांगितले.पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीने ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत संभाजी जगताप यांनी पत्र दिले आहे. त्यामध्ये या कारखान्याच्या निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ला काँग्रेस पक्षाच्या वतीने बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शेतकरी, कामगार आणि कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी या पॅनेलला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.