बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अहवालात खासदार पार्थ पवार यांचे छायाचित्र किंवा नामोल्लेख नसल्याची बाब प्रचारामध्ये विरोधकांनी निदर्शनास आणून दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षावर नामुष्की ओढवली आहे. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी अनवधानाने ही बाब घडल्याचे स्पष्टीकरण दिले असले, तरी विरोधकांनी हा मुद्दा घेऊन प्रचार सुरू केल्याने ‘राष्ट्रवादी’ची अडचण झाली आहे.
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. कारखान्याच्या अहवालात खासदार पार्थ पवार यांचे छायाचित्र नसल्यावरून शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी टीका केली. ‘कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षांना पार्थ पवार यांचे छायाचित्र अहवालात घेणे लज्जास्पद वाटत असावे किंवा ते त्यांच्यापेक्षा कमी वयाचे असल्याने छायाचित्र अहवालात नसावेे,’ असा आरोप काकडे यांनी केला. त्यावर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी नजरचुकीने ही बाब घडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पद्धतीवरूनही काकडे यांनी जगताप यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, की पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शेवटच्या दिवशी गाड्यांचा ताफा घेऊन शक्तिप्रदर्शन करण्याची गरज काय होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतरही अशा प्रकारचे शक्तिप्रदर्शन करणे योग्य आहे का, असा सवाल काकडे यांनी केला आहे.
समाजमाध्यमात निनावी पत्र
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून समाजमाध्यमात एक निनावी पत्र प्रसारित झाले आहे. त्या पत्रात सोमेश्वर कारखान्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे. कारखान्याच्या अहवालात पार्थ पवार यांचे छायाचित्र किंवा नामोल्लेख नसल्याचा मुद्दा त्यात उपस्थित केला आहे. पवार कुटुंबाला बाजूला करण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवालही पत्रातून करण्यात आला आहे.
अजित पवारांच्या स्मारकासाठी प्रतिटन ५० रुपये निधी
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकासाठी कारखान्याच्या सभासदांकडून प्रतिटन ५० रुपये भागविकास निधीतून देण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. कारखान्याच्या ६२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. या सभेत कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी अहवालात खासदार पार्थ पवार यांचे छायाचित्र समाविष्ट करणे अनवधानाने राहिल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या मुद्द्याचे काही जणांकडून राजकारण करण्यात आल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सभासदांना प्रतिटन ११ हजार रुपये दर देण्याचे सभेत जाहीर करण्यात आले.
