बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची निवड झाली. जय पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. ५) कारखान्याच्या जिजाऊ सभागृहात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या कारखान्याच्या पहिल्याच निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सर्व २१ जागा जिंकत कारखान्यावरील वर्चस्व कायम राखले होते. त्यानंतर आता अध्यक्षपदाची धुरा अनुभवी राजवर्धन शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
सोमेश्वर कारखान्याची यंदाची निवडणूक बारामतीच्या सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची लढाई ठरली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीतून कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बंडखोरी करीत स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. विशेष म्हणजे, भाजप नेते व पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनीही पुरुषोत्तम जगताप यांना साथ दिली होती. त्यांच्या मदतीने जगताप यांनी लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणुकीत आव्हान उभे केले. पुरुषोत्तम जगताप यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
गेली अनेक वर्षे कारखान्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी भाजपच्या साथीने स्वतंत्र पॅनेल उभे करीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाला थेट आव्हान दिले. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठीही अजित पवार यांच्या निधनानंतर कारखान्यावरील वर्चस्व कायम राखण्याची ही पहिली मोठी सहकार क्षेत्रातील परीक्षा होती. याशिवाय युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखालील सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलनेही निवडणुकीत स्वतंत्र आव्हान उभे केले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार आणि पुरुषोत्तम जगताप अशी तिरंगी लढत रंगली.
११ ऑक्टोबरला झालेल्या मतदानानंतर १२ ऑक्टोबरला मतमोजणी झाली. या निकालात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागा जिंकल्या. मुरूम-वाल्हे गटात विक्रम भोसले यांनी बंडखोर पुरुषोत्तम जगताप यांचा पराभव केला. जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने उभे केलेले आव्हानही या निकालात निष्प्रभ ठरले. निवडणुकीनंतर अध्यक्षपदासाठी राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे, अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, संग्राम सोरटे आणि सुनील भगत यांच्या नावांची चर्चा होती. अखेर अध्यक्षपदासाठी राजवर्धन शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, तर उपाध्यक्षपदाची जबाबदारी संग्राम सोरटे यांच्याकडे देण्यात आली.
