बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर होणाऱ्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षांनीच स्वतंत्र पॅनल उभा केल्यामुळे राज्यातील सर्वाधिक ऊस दर देणाऱ्या आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत असणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक राजकीय दृष्ट्या रंगतदार बनली आहे. हा गुंता सोडविण्याचे काम आता बारामतीकरांच्या हाती आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दुसरे पॅनल करत राष्ट्रवादीसमोरच मोठे आव्हान उभे केले आहे तर दुसरीकडे पवार विरुद्ध पवार असा संघर्ष सुरूच आहे. युवा नेते युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) पक्षाच्या वतीने पॅनल निवडणूक रिंगणात उतरवले असून, गावागावात मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचा धडाका सुरू ठेवला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सोमेश्वरचे राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदावर पुरुषोत्तम जगताप गेले १३ वर्षे आहेत. जगताप यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे संचालक मंडळातील काहींना उमेदवारी नको अशी मागणी केली. खासदार पार्थ पवार यांनी बाहेरून आलेल्या पक्ष निरीक्षकांच्या अहवालावर विश्वास ठेवत पुरुषोत्तम जगताप यांच्या म्हणण्याकडे काणाडोळा केला आणि तिथेच मानापमान सुरू झाले. जगताप यांनी दुसऱ्या पॅनलची तयारी केली.

पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे आता भाजपमध्ये असून, पुरुषोत्तम जगताप यांनी संजय जगताप यांना आपल्या बाजूला वळवले आणि आपल्या पॅनलची पायाभरणी केली. दुसरीकडे पुरुषोत्तम जगताप यांनी अचानक वेगळा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीची भंबेरी उडाली. राष्ट्रवादीने तातडीने आपले पॅनल देखील उभे केले. पुरुषोत्तम जगताप यांना सर्व काही दिले होते मात्र पुरुषोत्तम जगताप यांनी गद्दारी केली असा सूर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी अळवला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुरुषोत्तम जगताप यांना अजित पवार यांचे छायाचित्र वापरू नये असा इशारा देखील दिला. तेथूनच पुढे राजकारण आणखी रंगत गेले.

अजितदादा महापुरुष आहेत त्यामुळे फोटो वापरणारच असा दावा करत पुरुषोत्तम जगताप यांनी या निवडणुकीत रंगत आणली. सोमेश्वर साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र हे सर्वात मोठे आहे. बारामतीसह पुरंदर, खंडाळा आणि फलटण तालुक्यात या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळेच चार तालुक्यातील राजकारण या कारखान्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. यातील तीन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार आहेत, तर पुरंदरमध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे विजय शिवतारे हे आमदार आहेत.

कागदावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष या निवडणुकीत वरचढ आहे. मात्र दुसरीकडे पुरुषोत्तम जगतापांना सभासदांची सहानभूती आहे.‌ याच सहानभूतीच्या जोरावर गेल्या २२ वर्षातील घडामोडींचा दाखला देत पुरुषोत्तम जगताप हे कोणत्याही परिस्थितीत चुकीचा निर्णय घेऊ नका असे आवाहन सभासदांना करत आहेत. तर दुसरीकडे आम्हाला कारखाने चालवण्याचा अनुभव आहे आणि कारखाने उत्तम चालवतो पुरुषोत्तम जगताप हे हुकूमशाही पद्धतीने कामकाज चालवतात असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने केला आहे.

सध्या निवडणुकीत जय पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पक्षाच्यावतीने पॅनलची धुरा सांभाळत आहेत. आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार सामना सोमेश्वरमध्ये देखील दिसला आहे. माळेगावच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मोठे अपयश आले मात्र आता पुन्हा एकदा सोमेश्वरच्या निवडणुकीत देखील युवा नेते युगेंद्र पवार यांनी कंबर कसली असून, त्यांनी तोडीस तोड पॅनेल उभा केले आहे. या पॅनलच्या वतीने ते दिवसभर गावागावात सभा घेत असून मतदारांच्या भेटी गाठी घेत आहेत. हा पॅनेल नेमकी किती मते घेतो,यावर निवडणुकीचे गणित अवलंबून असणार आहे.