बारामती : बारामतीतील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाचे ‘शेतकरी पॅनेल’ निवडणूक लढविणार असल्याचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी जाहीर केले आहे. 

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोमेश्वरनगर येथे शनिवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुुंकले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षानेही निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे. याबाबत युवा नेते युगेंद्र पवार म्हणााले, ‘ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शेतकरी पॅनल’ उभे केले जाणार आहे. त्यामध्ये उच्चशिक्षित, तरुण, ज्येष्ठ आणि अनुभवी उमेदवारांचा समावेश असणार आहे. हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालविण्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोठा वाटा आहे.’

‘अजित पवार यांचा कारखान्यावर वचक होता. कारखान्यात कोणताही गैरप्रकार आढळल्यास त्याची तातडीने चौकशी करून आवश्यक कारवाई केली जात होती. अजित पवार हयात नसले, तरी शरद पवार यांनी सोमेश्वर कारखान्याकडे लक्ष द्यावे, अशी सभासदांची इच्छा आहे.’ असे पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात बारामती, पुरंदर आणि फलटणमधील गावे आहेत. मुगुटराव उर्फ अप्पासाहेब काकडे यांनी १९६० मध्ये स्थापन केलेल्या या कारखान्यावर आता पवार कुटुंबाचे वर्चस्व आहे. या वेळच्या निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर उभे राहणार असल्याने निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केल्याने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम

उमेदवारी अर्ज दाखल – ७ ते ११ सप्टेंबर

उमेदवारी अर्जांची छाननी – १५ सप्टेंबर

वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध – १६ सप्टेंबर

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत – १६ ते ३० सप्टेंबर

अंतिम उमेदवारांची यादी – २ ऑक्टोबर

मतदान – ११ ऑक्टोबर मतमोजणी – १२ ऑक्टोबर