पुणे : ‘राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून नदी सुधार प्रकल्प राबवत आहे. मात्र, या योजनेतून सिमेंटची जंगले उभी केली जात आहेत. या सिमेंटमुळे नदीच्या परिसरातील अधिवास नष्ट होत आहे. सरकारला या धोक्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे,’ असे मत सोमनाथ मुसुडगे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे २० वर्षांपासून इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान राबवणारे देहू गावचे रहिवासी सोमनाथ आबा मुसुडगे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मुसुडगे यांना सन्मानीत करण्यात आले. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना मुसुगडे बोलत होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर, प्रज्ञा महाजन आदी उपस्थित होते.
मुसुडगे म्हणाले, ‘स्वच्छ, सुंदर, निर्मळ पाणी हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, सुशिक्षित समजला जाणारा समाजच निसर्गाप्रती अशिक्षितपणे व्यवहार करत आहे. नद्यांचे प्रदुषण मोठ्या प्रमाणात होत आहे. नदी स्वच्छ राहण्यासाठी त्यात सोडले जाणारे सांडपाणी नाले बंद असणे गरजेचे आहे. गावातील नदी प्रदुषित होऊ नये, यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. नदी जशी उगमापाशी स्वच्छ असते, तशीच ती संगमापाशीही असावी म्हणून गेली २० वर्षे इंद्रायणी स्वच्छता अभियान राबवत आहे.’
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ‘नदीचे प्रदुषण, पाण्याचे दुर्भिक्ष्य या घटना मानव निर्मित आहेत. पाण्याचे संकट हे जगातील सर्वात भीषण संकट आहे. नदीत बदल घडले की, तेथील समाज आणि संस्कृती बदलते. नदीला जसे पौराणिक, सांस्कृतिक महात्म्य असते तसेच शास्त्रीय महत्त्व देखील असते. नद्या प्रदुषित झाल्या तर पृथ्वी राहण्यास योग्य ठरणार नाही, हे कटू सत्य आहे.’ इंद्रायणी नदीची माहिती देताना मोरे म्हणाले, ‘इंद्रायणी नदीला पौराणिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक पावित्र्य आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीने तारले. महाराष्ट्र प्राकृत भाषाही इंद्रायणी नदीकाठी निर्माण झाली.’
शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात ‘पाणी’ या विषयावरील कविसंमेलनात जयंत भिडे, मीरा शिंदे, प्रभा सोनवणे, आश्लेषा महाजन, तनुजा चव्हाण, वैजयंती आपटे, स्वाती दाढे, मनिषा सराफ, प्रतिमा कुलकर्णी, मृणाल जैन, आशा केदारे, सुजित कदम यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले.
