पुणे : पत्नीला नांदायला पाठवत नसल्याचा राग मनात धरुन सासऱ्याची रिक्षा पेटवून देणाऱ्या जावयाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. प्रशांत संजय शिवशरण (वय २५, रा. महात्मा फुले वसाहत, हडपसर) असे अटक केलेल्या जावयाचे नाव आहे.
प्रशांत शिवशरण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. ही घटना शांतीनगर वसाहतीत कॅनॉल रस्त्याला ४ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक असून त्यांच्या मुलीचा प्रशांत शिवशरण याच्याबरोबर दोन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. दारु पिऊन तो नेहमी पत्नीला मारहाण करुन त्रास देत होता. त्यामुळे वडील मुलीला शांतीनगर वसाहत येथील घरी घेऊन आले. प्रशांत याने तिला नांदायला पाठवा, म्हणून अनेकदा सांगितल्यानंतरही फिर्यादी यांनी मुलीला पाठविले नाही. हा राग मनात धरुन ४ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास प्रशांत शिवशरण याने कॅनॉल रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षाला आग लावून पेटवून दिली. त्यात रिक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रशांत शिवशरण याला अटक केली. पोलीस हवालदार रमेश गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
