नव्या दमाच्या कलाकारांचे गायन RagaNXT.com या संकेतस्थळावर उलपब्ध झाले असून फेसबुक या सोशल माध्यमावरही या उपक्रमावर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अभिजात संगीत हा सांस्कृतिक वारसा असून संगीताच्या प्रचारासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर यशस्वी झाल्याचे हे द्योतक आहे.
परदेशात स्थायिक असलेले पण, कंपनीच्या कामानिमित्त पुणे आणि मुंबईला वारंवार भेट देणारे अरुण जोशी यांनी हा खटाटोप केला आहे. नोव्हेंबरमध्ये ते पुण्याला आले असताना यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे डॉ. रेवा नातू यांची शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीताची मैफल त्यांनी ऐकली. त्यातून मला ही कल्पना सुचली, असे जोशी यांनी सांगितले. अशी नवीन दमदार गायकी ऐकण्याची संधी केवळ पुणे आणि मुंबईला येऊनच मिळणार का, हा प्रश्न मला पडला. नव्या पिढीतील कसलेले कलाकार अभिजात संगीताची आराधना करून सुंदरपणे मैफली गाजवीत आहेत. मात्र, या कलाकारांना जगभर पोहोचविण्यास माध्यमच कमी पडत आहे हे ध्यानात आल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वीचे कलाकार आकाशवाणी माध्यम असेल किंवा मोठय़ा रेकॉर्डिग कंपन्यांमार्फत कला सादरीकरण करीत. गेल्या पाच-दहा वर्षांत जमाना बदलला आहे. सीडी विकल्या जात नाहीत म्हणून नवीन ध्वनिमुद्रणं कमी झाली आहेत. अभिजात संगीताचा प्रचार आणि प्रवास जगभर होण्यासाठी नवीन स्टुडिओ रेकॉर्डिग होऊन त्यासाठी प्रसार माध्यम म्हणून इंटरनेटची कास धरून पुढे चालले पाहिजे. डॉन स्टुडिओचे प्रमुख आणि प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे, सलिल कुलकर्णी, रमेश गांगोली यांच्याशी विचारविनीमय करून रागाएनएक्सटी या संस्थेची स्थापना केली. हृषिकेश बडवे, अमोल निसळ, गौरी पठारे, रेवा नातू, सानिया पाटणकर, अनुराधा कुबेर अशा नव्या पिढीतील वीस कलाकारांनी ध्वनिमुद्रणं करून घेतली. चाळीस दिवसांत ‘क्लाऊड’ सेटअप आणि संकेतस्थळ विकसित झाले. इतकी वर्षे अमेरिकेमध्ये गेल्यानंतर जागतिक परिप्रेक्ष्यातून आपला सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे मेळ घालण्याचा प्रयत्न साध्य झाला असल्याचे जोशी यांनी सांगितले.