महाराष्ट्रात सादरीकरण करताना मनापासून आनंद होतो. कलेला खऱ्या अर्थाने दाद देणारे रसिक महाराष्ट्रात आहेत. त्यांना तुम्ही फार काळ ‘बुद्धू’ बनवू शकत नाही. ते तुमच्यावर प्रेम करतील, मात्र खोटेपणा उघड झाल्यानंतर ते जागा दाखवून देतील आणि म्हणून महाराष्ट्रीय जनता मला प्रिय आहे, अशी भावना प्रख्यात गायक सोनू निगम यांनी चिंचवड येथे व्यक्त केली.
नाटय़ परिषदेच्या िपपरी शाखेच्या वतीने सोनू निगम यांना आशा भोसले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तेव्हा सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, पं. हृदयनाथ मंगेशकर, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, नाटय़ परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, बांधकाम व्यावसायिक राजेशकुमार सांकला, कृष्णकुमार गोयल, हेमेंद्र शहा, विरोधी पक्षनेते राहुल भोसले आदी उपस्थित होते.
सोनू निगम म्हणाले, की महाराष्ट्रीय माणसाला संगीताची आवड आहे, तशीच चांगली जाणही आहे. महाराष्ट्रात गाण्यांचे सादरीकरण करताना नेहमीच आनंद वाटतो. मराठी माणसाने कायमच आपल्यावर प्रेम केले. आशा भोसले यांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी आहे. त्यांची गाणी ऐकतच मोठा झालो. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. आशाताईंच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे मी स्वत:चे भाग्य समजतो. प्रास्ताविक भाऊसाहेब भोईर यांनी केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णकुमार गोयल यांनी आभार मानले.
िपपरी-चिंचवडला स्वच्छ शहराचे पारितोषिक मिळाले. त्याच पद्धतीने, सांस्कृतिक क्षेत्रातही हे शहर प्रथम क्रमांकावर येईल आणि त्याचे श्रेय भाऊसाहेब भोईर यांना असेल.
– पं. हृदयनाथ मंगेशकर