मराठवाडा, विदर्भात दसऱ्यानंतर पुन्हा विजांसह पावसाची शक्यता

पुणे : राज्याच्या बहुतांश भागात आता पावसाळी स्थिती दूर होऊन हवामान कोरडे झाल्याने तापमानात वाढ सुरू होऊन उकाड्यातही वाढ झाली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत दिवसाच्या कमाल तापमानात आणखी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र काही भागांत दसऱ्यानंतर पुन्हा विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा सध्या महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू आहे. मराठवाडा आणि विदर्भासह निम्म्या महाराष्ट्रातून मोसमी वारे सध्या माघारी फिरले आहेत. त्यामुळे या भागात कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागातून मोसमी वारे परतणार आहेत. त्यामुळे या भागातही कोरडे हवामान निर्माण होणार आहे. पावसाळी वातावरण दूर होऊन कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होताच उन्हाचा चटका वाढू लागला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा काही प्रमाणात वाढला आहे. रात्रीच्या किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत वाढ नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे उकाड्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही अनेक ठिकाणी हवामान कोरडे होणार असल्याने दिवसाच्या कमाल तापमानाचा पारा दोन ते तीन दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र तापमानात झपाट्याने बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्याचा परिणाम विदर्भ आणि मराठवाड्यात होण्याची शक्यता असून, दसऱ्यानंतर १६ ऑक्टोबरपासून काही भागात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.