पुणे : कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना वाढती मागणी लक्षात घेता राज्यात शासकीय कौशल्य विद्यापीठाची स्थापना येत्या काही दिवसांत मुंबईत करण्यात येणार आहे. तसेच कौशल्य शिक्षण राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सॅटेलाइट सेंटरची निर्मिती करण्याचे नियोजन असल्याची माहिती आरोग्य, कौशल्य विकासमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा १५ वा वर्धापन दिन, सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यावसायिक विद्यापीठाच्या सहाव्या वर्धापन कार्यक्रमात टोपे बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, कुलगुरू डॉ. अश्विनी कुमार शर्मा आदी या वेळी उपस्थित होते.
टोपे म्हणाले, की जर्मनीसारख्या देशांमध्ये विद्यार्थ्यांना पाचवीपासून कौशल्य अभ्यासक्रम शिकता येतो. अशाच पद्धतीने आपल्याकडे शालेय अभ्यासक्रमात कौशल्य विषयाचा समावेश करण्याचा विचार करायला हवा. कौशल्य शिक्षणात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निग, इंटरनेट ऑफ थिंग्स या विषयांचा समावेश होणे गरजेचे आहे. सॅटेलाइट सेंटरची स्थापना ठिकठिकाणी झाल्यास त्याद्वारे विद्यापीठातील उत्तम अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकण्याची संधी मिळेल, असेही टोपे यांनी सांगितले. कौशल्य शिक्षणात सुधारणेला वाव असल्याने, राज्यातील तज्ज्ञ, अभ्यासक, विद्यार्थी, नागरिक यांनी सरकारला सूचना करण्याचे आवाहन टोपे यांनी केले. विद्यापीठाद्वारे गृहिणी, तरुण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे कमी कालावधीचे अभ्यासक्रम देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत.