शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने घेतल्या आणि त्याच जागांसाठी महापालिकेने संरक्षण खात्याला कोटय़वधी रूपये दिले. लष्कराकडून नेहमीच अडवणूक केली जाते. संरक्षण विभागाशी संबंधित अनेक प्रश्न गेल्या २५-३० वर्षांपासून रखडले आहेत. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाठपुरावा करून त्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावू, अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुनावळ्यात बोलताना दिली. मराठी शाळांचा दर्जा चांगला राखल्यास तेथेही इंग्रजी शाळांप्रमाणे प्रवेशासाठी रांगा लागतील, असेही ते म्हणाले.
माळवाडीतील भिकोबा सोपान भुजबळ विद्यालयाचे उद्घाटन पवारांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, पक्षनेते मंगला कदम, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी महापौर आझम पानसरे, नगरसेवक हनुमंत गावडे, शेखर ओव्हाळ, चेतन भुजबळ आदी उपस्थित होते. शाळेसाठी जागा देणाऱ्या भुजबळ परिवारातील सदस्यांचा अजितदादांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पवार म्हणाले, पर्रीकर मराठी जाणणारे मंत्री असून त्यांची शरद पवारांशी चांगली मैत्री आहे. त्या माध्यमातून वर्षांनुवर्षे रखडलेल्या प्रश्नांवर तोडगा काढू. लष्करानेही सांमजस्याची भूमिका घ्यावी. बोपखेल व अन्य गावांमध्ये नागरिकांची अडवणूक केली जाते, ते प्रकार त्यांनी टाळावेत. कुंटे समितीचा अहवाल महिनाभरात सादर होईल. ‘स्मार्टसिटी’ योजनेत पिंपरीचा समावेश झाला पाहिजे. पालिका अंदाजपत्रक करताना नवीन गावातील रस्त्यांना प्राधान्य द्यावे. नदीपात्र अस्वच्छता राहू नये, लगतचा परिसर विकसित करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी शेखर ओव्हाळ, चेतन भुजबळ यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले. विजय लोखंडे यांनी आभार मानले.
‘उगवत्या सूर्याला नमस्कार करू नका’
नगरसेवक शेखर ओव्हाळ आणि शिक्षण मंडळाचे सदस्य चेतन भुजबळ यांनी पुनावळ्यात मोठय़ा प्रमाणात अजितदादांचे स्वागतासाठी फलक लावले होते, त्याचा संदर्भ देत पवार म्हणाले, हे सगळे राष्ट्रवादीमुळे आहे, हे लक्षात ठेवा. उगवत्या सूर्याला नमस्कार करू नका, अशी सूचक टिप्पणी केली. चांगली कामे करा, पक्षाची व पालिकेची बदनामी होईल, असे उद्योग करू नका, अशी तंबी अजितदादांनी शिक्षण मंडळाच्या सदस्यांना दिली. महापुरूषांची ‘वाटणी’ करू नका, असेही त्यांनी सुनावले.