पुणे : मोबाइलचा वापर, व्हाॅट्सॲपवरील मूक संभाषण, शेजाऱ्याशी बोलणे, संगीत श्रवण या गोष्टींपासून दूर राहून रविवारच्या सकाळी अनावश्यक शारीरिक हालचाल न करता खुर्चीवर तासभर बसून त्यांनी ‘एक तास स्वत:साठी खास’ उपक्रमाद्वारे स्तब्धतेतून शांततेची प्रचिती घेतली. कल्याणीनगर परिसरात पोर्शे मोटार अपघाताच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘के अँड क्यू’ परिवाराच्या वर्धापनदिनानिमित्त ‘स्पेस आउट – एक तास स्वत:साठी खास’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण कोरियात गेल्या दहा वर्षांपासून राबविण्यात येणारा हा उपक्रम भारतामध्ये प्रथमच पुण्यात झाला. अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी आवर्जून उपस्थित राहून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. के अँड क्यू परिवाराचे सत्येंद्र राठी, प्रमोद मालपाणी, अश्विनी धायगुडे, संध्या सोमाणी, तेजस्विनी गांधी या वेळी उपस्थित होत्या.
‘आपण सगळेच सतत पुढे जाण्यासाठी धावपळ करत असतो; पण, काही वेळ थांबण्यातूनच जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळते’, असे मत प्राजक्ता हनमघर यांनी व्यक्त केले. ‘आपल्या जगण्याला आलेला अनैसर्गिक वेग खरंच गरजेचा आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. या सगळ्यांत आपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलो, कुणाला भेटलो तरी छायाचित्र टिपतो. चित्रीकरण करतो. डोळ्यांनी समोरचे पाहणे, अनुभवणे, भेटल्यावर आपुलकीने चौकशी करणे हे सारे या वेगामुळं कुठे तरी मागे पडत आहे. त्यामुळेच जगणे खऱ्या अर्थाने पुढे जाण्यासाठी स्वस्थ बसण्याची गरज आहे. स्वस्थ बसल्यावर स्वतःकडे नव्या नजरेने पाहता येते, असेही हनमघर यांनी सांगितले.
‘शांत, तेही एक तास सलग बसणे हेच मला कठीण वाटत होते. त्यामुळेच या उपक्रमात सहभाग घेत मी शांत बसू शकतो हे माझ्या नव्याने लक्षात आले. स्वस्थ बसण्यातून स्वतःतील शांतता अनुभवता आली,’ असे बारावीतील साई घुमटकर याने सांगितले. ‘नेहमीच स्वतःसाठी वेळ काढतो. पण, डोळे उघडे ठेवून स्वतःकडे पाहायला या एक तासाने शिकवले आणि हा अनुभव विशेष होता,’ अशी भावना सविता घोरपडे यांनी व्यक्त केली. ‘हा अनुभव वेगळा आणि शांत चित्ताने बसू शकतो हा आत्मविश्वास देणारा होता’, अशी प्रतिक्रिया काका वडके यांचे पुत्र रवी वडके यांनी दिली.
या उपक्रमात विविध वयोगटांतील अडीचशेहून अधिक व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये ६० टक्के महिलांचा समावेश होता. तर, तासभर स्वस्थ बसणाऱ्यांमध्ये ७० टक्के जणांनी चाळिशी पार केलेली होती, अशी माहिती सत्येंद्र राठी यांनी दिली.