मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी अप्रत्यक्षपणे केलेल्या टीकेला शिवसेना नेते गजानन कीर्तीकर यांनी पाठिंबा दर्शवला आणि ‘पवार उशिरा बोलले पण, जनतेच्या मनातील बोलले,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.
गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून होणाऱ्या अन्यायासंदर्भात शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. कीर्तीकर म्हणाले की, भाजपकडील बारामती मतदार संघ शिवसेनेकडे घेऊन सातारा मतदारसंघ त्यांना देण्याचा विचार सुरू आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध चांगले मत नाही. या ठिकाणाहून आमदार विजय शिवतारे लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. पुणे जिल्ह्य़ातील २१ मतदार संघांपैकी १५ जागा आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पोलीस आयुक्तांना पाठिंबा
पुण्याचे पोलीस आयुक्तांना बदलल्याशिवाय डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास लागणार नाही, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंढे यांनी विधान केले होते. मात्र, आमदार गिरीश बापट आणि गजानन कीर्तीकर यांनी पोलीस आयुक्त चांगले काम करत आहेत. त्यांना शासनाकडून सहकार्य होत नसल्याचे त्यांनी सांगितले.