पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी आणि देहू येथे उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी पीएमपीने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. ही सेवा गुरुवारपासून (८ जून) सुरू होत असून येत्या सोमवारपर्यंत (१२ जून) ती सुरू असेल, अशी माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शहर, उपनगरे आणि राज्यभरातून शेकडो भाविक आळंदी आणि देहू येथे उपस्थित रहातात. त्यामुळे आळंदीसाठी स्वारगेट, महापालिका भवन, हडपसर, पुणे रेल्वे स्थानक, निगडी, भोसरी, हिंजवडी आणि चिंचवड या स्थानकांवरून सध्या संचलनात असणाऱ्या गाड्यांबरोबरच जादा गाड्या अशा एकूण १४२ गाड्या प्रत्येक दिवशी संचलनात गुरुवारपासून सोमवारपर्यंत संचलनात राहणार आहेत. याशिवाय रविवारी (११ जून) रात्री बारा वाजेपर्यंत आळंदी येथे जाण्यासाठी विशेष बस व्यवस्था करण्यात आली आहे. हेही वाचा >>> आळंदी : गर्दी आणि चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी खबरदारी, माऊली प्रस्थानावेळी प्रमुख दिंडीतील प्रत्येकी ‘इतक्या’ वारकऱ्यांना प्रवेश देहू येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानक, महापालिका भवन, निगडी या ठिकाणावरून संचलनातील आणि जादा गाड्या मिळून ३० गाड्यांद्वारे सुविधा देण्यात येणार आहे. याशिवाय देहू ते आळंदी या मार्गावर १२ गाड्यांद्वारे सुविधा दिली जाणार आहे. सोमवारी (१२ जून) पालखी प्रस्थान आळंदी येथून होणार आहे. त्यामुळे पहाटे अडीच वाजल्यापासून स्वारगेट, पुणे रेल्वे स्थानक, हडपसर, महापालिका भवन या ठिकाणाहून आळंदीला जाण्यासाठी जादा १८ गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त नेहमी संचलनात असणाऱ्या गाड्या सकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून सुरू होणार आहेत. हेही वाचा >>> जेजुरी : खंडोबा गडावर चार स्थानिक विश्वस्तांची नेमणूक होणार, ग्रामस्थांचं आंदोलन मागे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बसस्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील ११३ गाड्या आळंदीसाठी भोसरी आणि विश्रांतवाडीपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय प्रवाशांच्या गरजेनुसार जादा गाड्याही सोडण्यात येणार आहेत. पुण्याहून पालखी प्रस्थानाच्या दिवसी (बुधवार, १४ जून) हडपसरमध्ये पालखी दर्शनासाठी दुपारी बारा ते एक या दरम्यान थांबणार आहे. त्यामुळे महात्मा गांधी स्थानक येथून पुणे रेल्वे स्थानक, वारजे-माळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड आणि आळंदी येथे जाण्यासाठी बस व्यवस्था करण्यता आली आहे. कात्रज-कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर आणि वाघोलीसाठी मगरपट्टा येथून गाड्या सोडण्यात येणार आहेत. पालखी सोहळा सोलापूर आणि सासवड मार्गाने पुढे गेल्यानंतर सोलावूर, उरूळी कांचन मार्गे बससेवा सुरू करण्यात येणार आहे. तर हडपसर ते सासवड दरम्यान दिवेघाट वाहतुकीस बंद राहणार असल्याने या मार्गावरील वाहतूक बोपदेव घाट मार्गे वळविण्यात येणार असून स्वारगेट, पुणे रेल्वे स्थानक आणि हडपसर अशा मार्गावर संचलन राहणार असल्याचे पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून कळविण्यात आले आहे.