पुणे : स्वच्छ शहर, सुंदर शहर असे देशपातळीवरील अनेक पुरस्कार मिळवूनदेखील शहरातील अनेक रस्त्यांवर कचरा तसेच घाणीचे साम्राज्य असल्याचे वारंवार समोर आले आहे. यावर उपाययोजना करण्याबरोबरच स्वच्छतेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी शहरात पुढील काही दिवसांत विशेष मोहीम राबविली जाणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
स्वच्छतेच्या संदर्भात नागरिकांचा सहभाग, जनजागृतीबरोबरच प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे महापालिका आयुक्त नवल किशाेर राम यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत त्यांनी स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी पुणे शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या ६० पेक्षा अधिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची (एनजीओ) बैठक बाेलाविली हाेती. या संस्थांकडून स्वच्छतेच्या संदर्भात सुरू असलेल्या कामाची माहिती घेण्यात आली.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन, पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासह घनकचरा विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. स्वच्छ पुणे अभियानांतर्गत शहरातील कचरा वर्गीकरणाचे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत नेणे, होम कंपोस्टिंगला प्रोत्साहन देणे, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू करणे, वस्ती पातळीवर जागृती मोहीम राबवणे, शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा शहर स्वच्छतेमध्ये सहभाग वाढविणे अशा विविध विषयांवर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यानुसार येणाऱ्या काळात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
महापालिकेच्या यंत्रणेकडूनदेखील अनेकदा स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष हाेते ही वस्तुस्थिती असल्याचे आयुक्त नवल किशाेर राम यांनी मान्य केले. स्वच्छतेच्या कामात प्रशासकीय यंत्रणेच्या त्रुटी दूर करण्यावर यापुढील काळात अधिक भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची तसेच झाडणकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी संदर्भात लक्ष दिले जाईल. या कर्मचाऱ्यांची हजेरी नाेंदविण्यासाठी त्यांना देण्यात आलेल्या उपकरणांची माहिती घेऊन यामध्ये अधिकाधिक पारदर्शकता कशी येईल. कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांचा सहभाग देखील यामध्ये कसा वाढेल, यावर भर राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र, राज्य पातळीवर स्वच्छतेबाबत अभियान राबविले जाते. पुणे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी त्याच पद्धतीने अभियान राबविण्याचा प्रयत्न आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. स्वच्छता मोहिमेत सर्वांचा सहभाग कसा होईल, यासाठी प्रयत्न राहणार आहे.नवल किशोर राम, महापालिका आयुक्त